पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार श्रीलंकेच्या दौऱ्यावर

कोलंबो : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्या भारतभेटीदरम्यान निश्चित करण्यात आलेल्या करारांना अंतिम रुप देण्यासाठी ते श्रीलंकेला जाणार आहेत. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ यांनी संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहीती दिली.
श्रीलंकेने शेजारी भारताबरोबरचे निकटचे संबंध जपले आहेत. अध्यक्ष दिसानायके यांचा पहिला परराष्ट्र दौरा हा भारताचा झाला होता. या दौऱ्यात विविध द्विपक्षीय सहकार्याच्या करारांवर चर्चा करण्यात आली होती. या करारांना अंतिम रुप देण्यासाठी मोदी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेला येणार आहेत, असेही हेराथ यांनी सांगितले.
हेही वाचा – IPL २०२५ साठी १० संघांचे कर्णधार ठरले, कोण कोणत्या संघाचे करणार नेतृत्व?
पंतप्रधान मोदींच्या श्रीलंका दौऱ्या दरम्यन विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. याशिवाय सामपोर सोलर पॉवर स्टेशनचे उद्घाटन देखील केले जाणार आहे. २०२३ मध्ये श्रीलंकेची सरकारी वीज कंपनी असलेल्या सिलोन इलेक्ट्रीसिटी बोर्ड आणि भारताच्या एनटीपीसी दरम्यान १३५ मेगावॅट वीज निर्मितीच्या सोलर पॉवर प्रकल्प उभारण्यचा करार करण्यात आला होता. २०१५ पासून पंतप्रधान मोदी यांचा हा चौथा श्रीलंका दौरा असणार आहे.