‘बात निकलेगी तो दूर तलक जाएगी’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

Rajnath Singh | केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यादरम्यान बदामी बाग छावणीत भारतीय लष्कराच्या जवानांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल जवानांचे अभिनंदन केले आणि पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला.
राजनाथ सिंह म्हणाले की, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूरदरम्यान तुम्ही जे काही केलं त्यावर संपूर्ण देशाला अभिमान आहे. मी जरी तुमचा संरक्षण मंत्री असलो तरी त्याच्या आधी मी भारताचा एक नागरिक आहे. संरक्षण मंत्री म्हणून तसेच भारताचा एक नागरिक म्हणून तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी येथे उपस्थित आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. मी ती ऊर्जा अनुभवण्यासाठी आलो आहे, ज्याने शत्रूला उद्ध्वस्त केले. तुम्ही ज्या पद्धतीने सीमेपलीकडील पाकिस्तानच्या चौक्या आणि बंकर उद्ध्वस्त केले ते शत्रू विसरू शकत नाही.
ऑपरेशन सिंदूर फक्त एका मोहिमेचे नाव नाही, ही आमची प्रतिबद्धता आहे. ज्यानुसार भारताने दाखवून दिले की आम्ही फक्त संरक्षणच करत नाहीत, वेळ आल्यावर कठोर निर्णय देखील घेतो आणि कठोर कारवाई देखील करतो. हे ऑपरेशन प्रत्येक जवानाच्या डोळ्यातील स्पप्न होतं की प्रत्येक दहशतवादी तळावर आम्ही पोहचू आणि शत्रूची छाती फाडून आम्ही दहशतवादी तळांना उध्वस्त करूनच परत फिरू, असे राजनाथ सिंह म्हणाले.
हेही वाचा : नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अतिप्रसंग, चाकण एमआयडीसीतील घटना
दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये दहशतवादी कारवाई करून भारताच्या मस्तकावर जखम करण्याचा प्रयत्न केला, भारताची सामाजिक एकता तोडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांनी भारताच्या मस्तकावर वार केला, आपण त्यांच्या छातीवर वार केला. पाकिस्तानच्या जखमांचा इलाज यातच आहे की त्यांनी भारतविरोधीत आणि दहशतवादी संघटनांना आश्रय देणे बंद करावे आणि त्यांच्या भूमिचा वापर भारताच्याविरोधात होऊ देऊ नये, असेही राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले.
तुमच्या लक्षात असेल २१ वर्षांपूर्वी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमोर इस्लामाबादने घोषणा केली होती की त्यांच्या भूमिवरून दहशतवाद एक्सपोर्ट केला जाणार नाही. पण पाकिस्तानने भारताला धोका दिला आहे आणि आजही धोका देत आहे. याची किंमत त्यांना मोजावी लागली आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दात दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिकेची नव्याने व्याख्या केली आहे. ज्यानुसार भारताच्या जमिनीवर केलेला कोणताही दहशतवादी हल्ला ‘अॅक्ट ऑफ वॉर’ मानला जाईल. दोन्ही देशांमध्ये सध्या जे एकमत झाले आहे ते सीमेपलीकडून कोणतेही चुकीचे काम होणार नाही या आधारावरच झाले आहे. जर असं काही करण्यात आलं तर ‘बात निकलेगी तो बहुत दूर तक जायेगी’, अशा शब्दात सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला. तसेच पंतप्रधानांना हेही स्पष्ट केलं आहे की दहशतवाद आणि चर्चा कधीही एकत्र होणार नाही आणि चर्चा झाली तर दहशतवाद आणि पाक व्याप्त काश्मीर यावर होईल, असेही सिंह यावेळी म्हणाले.