गुढीपाडव्याला हापूस महागच ; लहरी हवामानाचा आंब्याला फटका

पुणे : फळांचा राजा हापूसला यंदा लहरी हवामानाचा फटका बसल्याने पहिल्या बहरातील आंब्याचा मोहर गळून गेला. परिणामी, नेहमीच्या तुलनेत यंदा निम्मेच उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याचा सण अवघ्या दहा दिवसांवर आला आहे. मात्र, बाजारात कच्च्या आंब्याची आवक कमी होत असल्याने गुढीपाडव्याला तयार हापूस महागच राहणार असल्याची चिन्हे आहेत.
यंदा लांबलेला परतीचा पाऊस, अपेक्षित न पडलेली थंडी आणि आता वाढलेला उन्हाचा पारा, या परिस्थितीचा फटका कोकणातील हापूस आंब्याला बसला आहे. पहिल्या बहरातील आंब्याचा मोहर गळून पडल्याने पिकावर परिणाम झाला आहे. यंदा आंब्याची आवक अतिशय कमी प्रमाणावर झाली आहे. मार्चमध्ये दरवर्षी मार्केट यार्डातील फळबाजारात कोकणातून दररोज 4 ते 5 हजार पेट्यांची आवक होते.
हेही वाचा – आयपीएलच्या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलीवूडचे कोणते कलाकार होणार सहभागी? जाणून घ्या
सध्या मात्र बाजारात दररोज 700 ते 1 हजार पेटी आंब्याची आवक होत आहे. नेहमीच्या तुलनेत ही अतिशय कमी आवक असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. एप्रिलमध्ये आंब्याची आवक वाढेल. दरवर्षी साधारणपणे 20 मेपर्यंत हंगाम सुरू असतो. यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवक सुरू राहील, असेही सांगण्यात आले.