कॉमेडीयन कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल
शिवसेना महिला आघाडीचे जोडे मारो आंदोलन

बुलडाणा : सुपारीबाज कॉमेडीयन कुणाल कामरा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करावी अशी मागणी बुलडाणा जिल्हा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली असून कामराच्या तैलचित्राला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे मारुन आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.
कॉमेडीयन कुणाल कामरा याने विडंबनपर काव्य समाजमाध्यमांवर प्रसारित केले त्या काव्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. शिवाय यापूर्वीही त्याने पंतप्रधान यांच्यावरही विडंबन काव्य केले होते. विशिष्ट पक्षाकडून सुपारी घेऊन आमच्या पक्षनेत्यांवर जाणून बुजून विडंबन करण्याचा प्रयत्न केल्या जात असेल तर शिवसेना यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही. त्याला जसेच्या-तसे उत्तर देण्यात येईल.
हेही वाचा – महाराष्ट्राचा झेंडा दिल्लीत फडकला… ई साहित्याला राष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कार
या विडंबनकार कामरा विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास तत्काळ अटक करावी. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत कुणाल कामरा याच्या तैलचित्राला जोडे मारुन आंदोलन करत निषेध नोंदविला.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मायाताई म्हस्के, अंजना खुपराव, कविता गायकवाड, अनिता झंवर, राधाताई फाटे, लताताई चव्हाण, कुमोद पाटील, संगीता बढे, रूपाली मिरगे यांच्यासह महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या.