breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Good News: महापालिका अधिकारी-कर्मचा-यांसाठी धन्वंतरी योजना पुन्हा सुरु

कर्मचारी महासंघापुढे आयुक्त श्रावण हर्डिकर यांची सपशेल माघार

विकास शिंदे

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी ‘धन्वंतरी स्वास्थ्य योजना’ सुरू आहे. मात्र, ही योजना बंद करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला. या निर्णयाविरोधात पालिका कर्मचारी महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून काम करीत निषेध नोंदवला. परंतू, आयुक्तांच्या आदेशाने बंद केलेली योजना उद्या (15 सप्टेंबरपासून) पुन्हा सुरु करण्याचे आदेश अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डाॅ. पवन साळवे यांनी दिले आहे. तसेच धन्वंतरी योजनेतील सर्व सभासदांना उपचारासाठी दाखल करुन घेण्यात यावे, असे आदेश पॅनेलवरील रुग्णालयास दिले आहेत.  

महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच कुटुंब व्याख्येनुसार, त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना १ सप्टेंबर २०१५ पासून सुरू केली. त्यासाठी धोरणही तयार केले. योजना सुरू झाल्यानंतर कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक धन्वंतरी योजनेच्या पॅनलवरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते. या योजनेसाठी सेवेत कार्यरत असणा-या अधिकारी, कर्मचा-यांकडून ३०० रुपये इतका स्वहिस्सा आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांकडून १५० रुपये स्वहिस्सा जमा केला जातो. जमा होणा-या हिश्श्याच्या दुप्पट रक्कम पालिका धन्वंतरी निधीत जमा करते. या योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांसमवेत करारनामा आहे.

धन्वंतरी स्वास्थ्य योजनेतील आजार, उपचारांचा समावेश यात केला आहे. त्याचप्रमाणे दुर्धर आजारांचाही समावेश आहे. धन्वंतरीतील ९३ रुग्णालयांचा समावेश आहे. मात्र, धन्वंतरी योजना सुरू झाल्यापासून आॅक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१९ अखेर ६० कोटी ९३ लाख रुपये इतक्या रकमेच्या बिलांची पूर्तता केलेली आहे. या योजनेत अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त रक्कम यावर खर्च होवू लागली आहे. त्यामुळे धन्वंतरी स्वास्थ्य योजना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 14 सप्टेंबर 2020 पासून रात्री 12 नंतर ही योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सर्व पॅनेलवरील रुग्णांलयांनी याची नोंद घेऊन 15 सप्टेंबरच्या पहाटे एकनंतर धन्वंतरी योजनेतील कोणत्याही सभासदांना या योजनेअंतर्गत उपचाराकरिता दाखल करून घेऊ नये, असे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात म्हटले होते.

तसेच धन्वंतरी स्थास्थ्य योजनेच्या धर्तीवरच वैद्यकीय प्रतिपुर्ती योजना सुरु करण्याचे नियोजन केले होते. त्याला महासभा आणि स्थायी मान्यता देखील घेतलेली नव्हती. तसेच निविदेद्वारे इन्शुरन्स कंपनीची निवड केली होती. न्यू इंडिया इन्शुरन्स विमा योजनेतून 60 दिवसांपर्यंत कोणत्याही रुग्णालयात औषधोपचार करण्यात येणार होते. सर्व कर्मचाऱ्यांच्या विमा रक्कमेचा वार्षिक खर्च 27 कोटी 84 लाखांपर्यंत दर्शविला आहे. त्यावर कर्मचारी महासंघाने वैद्यकीय प्रतिपुर्ती योजना आणि विमा योजनेला विरोध दर्शविला होता.

दरम्यान, धन्वंतरी योजना बंद करु नये, याकरिता राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्यासह अन्य पदाधिका-यांनी पत्र दिली होती. त्यावर आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी विमा योजना लागू करण्याचा निर्णय स्थगित करुन 15 सप्टेंबरपासून धन्वंतरी स्वास्थ्य योजना चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील आदेश होईपर्यंत धन्वंतरी योजनेतील सभासदांना सर्व पॅनेलवरील रुग्णांलयानी उपचारांस दाखल करुन घ्यावे, असे आदेशात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button