breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

देहूत इंद्रायणीकाठी तुकाराम महाराज बीज सोहळा उत्साहात

पिंपरी महाईन्यूज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे आदेश पाळत, टाळमृदंगाचा गजर आणि तुकोबा तुकोबाच्या नामघोषात मंगळवारी (दि.30) देहूतील इंद्रायणी नदीकाठी संत तुकाराम महाराज बीज सोहळा उत्साहात पार पडला. संपुर्ण विश्वाची  कोरोनापासून मुक्ती मिळावी, अशी मागणी उपस्थित वारकऱ्यांनी विठूचरणी करण्यात आली. यंदा बीज सोहळा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला.

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी यंदा कोरोनामुळे 50 भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. संत तुकाराम महाराज मुख्य देऊळवाड्यात पहाटे तीन वाजता काकडा आरती झाली. पहाटे चार वाजता श्रींची महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे,विश्वस्त माणिक महाराज मोरे,संजय महाराज मोरे,विशाल महाराज मोरे,अजित महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, भानुदास महाराज यांच्याहस्ते झाली.

संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील महापुजा संस्थानचे विश्वस्त विशाल महाराज मोरे, अजित महाराज मोरे, माजी विश्वस्त विश्वजीत मोरे यांच्याहस्ते झाली. पहाटे साडेपाच वाजता वैकुंठस्थान मंदिरात संत तुकाराम महाराजांची महापुजा अध्यक्ष मधुकर महाराज मोरे,संजय महाराज मोरे,भानुदास मोरे, विशाल महाराज यांच्या हस्ते झाली.

सकाळी साडेदहा वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका भजनी मंडपातील फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या.परंपरेनुसार सेवेकरी मानकरी टिळेकर,पवार,भिंगारदिवे,तांबे,कांबळे,थोरात,गायकवाड,पांडे सेवेला उपस्थित होते. त्यानंतर पालखी वैकुंठस्थान मंदिराकडे मार्गस्थ झाली. संत तुकाराम महाराजांच्या पालखीपुढे सनई चौघडे,ताशे,नगारे,अब्दागिरी आणि टाळकरी होते. पालखीपुढे मानाची कल्याणकरांची दिंडी होती.

दुपारी साडेबारा वाजण्याची वेळ जसजशी जवळ येवू लागली तशी तुकाराम तुकाराम नामाचा जयघोष गजर सुरु झाला. उपस्थित भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली. वैकुंठस्थान मंदिरात संस्थानचे अध्यक्ष मधूकर महाराज मोरे ,विश्वस्त विशाल महाराज मोरे,खासदार श्रीरंग बारणे,पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याहस्ते आरती झाली. यावेळी अतिरिक्त पोलिस रामनाथ पोकळे,उपायुक्त आनंद भोईटे, प्रांताधिकारी सचिन बारवकर, अप्पर तहसिलदार गिता गायकवाड,मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे, पोलिस निरिक्षक विलास सोंडे,माजी विश्वस्त दिलीप महाराज मोरे,जिल्हा परिषद सदस्य शैला खंडागळे, व इतर उपस्थित होते. आरती झाल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखीचे मुख्य देऊळवाड्याकडे आगमन झाले.

पोलिस बंदोबस्त
संचारबंदी आदेशाचे कोठेही उल्लंगन होवू नये यासाठी देहूच्या चारही प्रवेशद्वाराजवळ चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.ग्रामस्थांनीही पोलिसांना साथ दिली.गावातील जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. रस्ते ओस होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button