‘छावा वाईट फिल्म आहे’; मराठी अभिनेत्याचं धक्कादायक विधान

Chhaava Movie | लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाने २०२५ मध्ये बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश मिळवले आहे. विक्की कौशलच्या या चित्रपटाने भारतात ६०० कोटींहून अधिक कमाई करत सर्वत्र वर्चस्व गाजवले. हिंदीसह तामिळ भाषेतही प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांमध्ये विशेष स्थान निर्माण केले. पहाटे सहाच्या शोपर्यंत आयोजित होणारी गर्दी याचेच द्योतक आहे. मात्र, या यशाच्या शिखरावर असतानाच सिनेमातील काही मुद्द्यांवरून वाद निर्माण झाले आहेत. शिर्के वंशजांनी आधीच आक्षेप नोंदवले होते, आणि आता सिनेमातील सूर्या ही भूमिका साकारणाऱ्या मराठी अभिनेता आस्ताद काळेनेही सिनेमावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
आस्तादने प्रदर्शनानंतर दोन महिन्यांनी फेसबुकवर पाच पोस्ट शेअर करत सिनेमातील त्रुटींवर भाष्य केले. त्याने लिहिले, “हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवले, याचे पुरावे काय? ‘छावा’ ही वाईट फिल्म आहे. फिल्म म्हणून आणि इतिहास म्हणूनही ती प्रॉब्लेमॅटिक आहे.” त्याने पुढे औरंगजेबाच्या चित्रणावरही आक्षेप घेतला. “औरंगजेबाचं वय आणि आजारपण बघता, तो इतक्या वेगाने चालू शकतो का? सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार नदीकाठी? असं कधीच होत नव्हतं. सोयराबाई परपुरुषासमोर बसून पान लावतायत आणि ते खातायत? हे कसं शक्य आहे?” असे प्रश्न त्याने उपस्थित केले.
हेही वाचा : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; नागरिकांनो बाहेर पडण्यापूर्वी हे लक्षात असू द्या..
आस्तादच्या या पोस्ट्समुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वी शिर्के वंशजांनी सिनेमात गनोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या चुकीच्या चित्रणावर आक्षेप घेतला होता. त्यावर दिग्दर्शकांनी स्पष्टीकरण देत वाद शमवला होता. मात्र, आता सिनेमात सहभागी असलेल्या अभिनेत्याने थेट इतिहासाच्या विकृतीकरणाचा आरोप केल्याने हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा