महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; नागरिकांनो बाहेर पडण्यापूर्वी हे लक्षात असू द्या..

Weather Report | सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा जोर वाढत असून नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. सोमवारपासून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. विशेषतः मुंबई शहरात अंतर्गत भागांमध्ये प्रचंड उकाडा जाणवू लागला.
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली तर सांताक्रूझ येथे तापमान 36.8 अंशांपर्यंत पोहोचले. उपनगरांमध्ये बोरिवली, भांडुप, पवई आणि मुलुंड येथे तापमान अनुक्रमे ३८.८°C, ३८.३°C, ३८°C आणि ३७.७° C इतके नोंदवण्यात आले.
हेही वाचा : ‘माझ्यासाठी शरीयत संविधानापेक्षा श्रेष्ठ’; झारखंडच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
सोलापूरात सोमवारी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान ठरले. सोलापूर हवामान विभागाने पुढील तीन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सात दिवसांपूर्वीच सोलापूरचे तापमान ४२ अंशांवर पोहोचले होते.
धाराशिव जिल्ह्यात मात्र उष्णतेची लाट पुढील तीन दिवस म्हणजे १७ एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, जिल्ह्याच्या काही भागांत तापमान ४४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यासोबतच काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.