दक्षिणेत भाजपाची नवी चाल ‘अण्णाद्रमुक’ ची घेतली ढाल !

उत्तर भारतामध्ये म्हणजे हिंदी पट्ट्यात प्रचंड यश मिळवणाऱ्या भाजपाला दक्षिण भारतात मात्र हातात कटोरा घेऊन दारोदारी भटकावे लागत आहे, ही बाब पक्षाच्या नेतृत्वाला नेहमीच खटकणारी आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून नरेंद्र मोदी यांच्या काळापर्यंत त्यात फरक पडलेला नाही, हे महत्त्वाचे!
दक्षिणेकडे प्रादेशिक पक्षच..!
दक्षिणेकडे केरळ असो तामिळनाडू असो किंवा अलीकडे आंध्र प्रदेश असो.. त्या ठिकाणी प्राबल्य आहे ते तेथील प्रादेशिक पक्षांचेच! पूर्वी तामिळनाडूत बलशाली असणाऱ्या जयललिता यांच्या अखिल भारतीय अण्णाद्रमुकाची किंवा एम. करुणानिधी यांच्या द्रमुकची सत्ता असायची. जनता सुद्धा त्यांनाच एकमेकांचे पर्याय मानायची.. पूर्वी भाजपा अगदी बाल्यावस्थेत होता, तेव्हा तामिळ नागरिकांनी काँग्रेसला सुद्धा कधी आपलेसे केले नाही. केरळ मध्ये तर कायम डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी इतरांचा शिरकाव होऊ देणार नाही. आंध्र प्रदेशात तेलुगु देशमने दबदबा कायम ठेवला.
भाजपाला दक्षिणेत झुकावं लागलं !
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीला कायमच दक्षिणेतील एखाद्या पक्षापुढे झुकायचे आणि त्यांच्याशी युती करून कसेबसे शक्य असेल तर सत्तेत सहभागी व्हायचे, अशीच आखणी करावी लागली! सध्या आंध्र प्रदेशात एन. चंद्रबाबू नायडू यांचा तेलगू देशम पक्ष हा भाजपा प्रणित एनडीए चा घटक पक्ष आहे.. ते केंद्रातही सत्तेत सहभागी आहेत. केरळ मध्ये भाजपला कोणी साथीदार मिळत नाही, पण आता तामिळनाडूमध्ये मात्र अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम यांच्याशी हात मिळवणी करून भाजपाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. अण्णा धुराई यांचा हा पक्ष, नंतर प्रसिद्ध अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांनी लोकप्रिय केला आणि त्यांच्या निधनानंतर अभिनेत्री जयललिता यांनी त्यावर घट्ट पकड घेतली !
पूर्वीच्या मित्र पक्षाला घट्ट मिठी..
भाजपाने तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा अण्णा द्रमुक बरोबर युती केली आहे. तो पक्ष आता भाजपा प्रणित एनडीए मध्ये सामील झाला आहे. भाजपा एवढ्यावरच न थांबता या पुढील विधानसभा निवडणूक अण्णाद्रमुकचे नेते पलानीसामी यांच्या नेतृत्वा खाली लढणार असल्याचे भाजपाचे नेते, गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले आहे. आपल्या पूर्वीच्याच मित्राला घट्ट मिठी मारण्याचा डाव भाजपने टाकलेला दिसतो.
भाजपाचे अन्नामलाई ‘साईड ट्रॅक’..
या आधी भाजपाने तामिळनाडूसाठी हुकमी एक्का काढला होता. पण त्या आश्वासक चेहऱ्याला काही दिवस बाजूला ठेवण्याचा निर्णय भाजपाने घेतलेला दिसतो. भाजपाचे ४१ वर्षाचे युवा अध्यक्ष अन्नामलाई यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तामिळनाडूमध्ये भाजपचा राज्यातील मतांचा टक्का आणि जनाधार वाढवला होता. त्याबद्दल त्यांचे देशभरात कौतुकही झाले होते. मात्र, आत्ता त्यांनी राज्याच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सोडला आहे. आता नयनार नागेंथिरन यांनी प्रदेश अध्यक्षपदाचा पदभार सांभाळला आहे. अन्नामलाई यांनी २०२४ पूर्वी अण्णाद्रमुक पक्षावर जाहीरपणे जोरदार टीका केली होती.. त्यांच्या नेतृत्वाचे अक्षरशः वाभाडेही काढले होते आणि आता या बदलत्या राजकीय समीकरणात त्यांच्याबरोबर काम करण्यास नकारही दिला होता, हे राजकारणात लक्षात घ्यायला हवे !
हेही वाचा : भारतातील पहिले ‘संविधान भवन’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित!
त्यांच्यामुळे द्रमुकला दूर ठेवले होते..
त्यावेळी त्यांचे ऐकून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने अण्णाद्रमुक ला एनडीए मध्ये घेण्यास नकार दिला होता. मग, आता भाजपा नेतृत्वाने अन्नामलाई यांना बाजूला करून, त्यांच्यावर काहीसा अन्याय करून अण्णा प्रमुख ला बरोबर घेतले का ? आणि असा निर्णय होणे, हा अन्नामलाई सारख्या युवा नेत्यावर अन्याय म्हणायचा का ? हा प्रश्न विचारला जात आहे. कालांतराने याचेही उत्तर मिळणार आहे. पण, त्यासाठी तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीपर्यंत थांबावे लागणार आहे.
तामिळनाडूतील राजकारण त्यांच्याभोवतीच..
तामिळनाडूचे राजकारण गेली अनेकवर्षे दोन्ही द्रविडीयन पक्षांभोवती केंद्रीत बनलेले आहे. यातील द्रमुक हा पक्ष गेल्या काही वर्षापासून उघडपणे देशविरोधी भूमिका घेत आहे. हिंदू विरोधी, हिंदी विरोधी आणि केंद्राविरोधी अशा भूमिका मुख्यमंत्री स्टॅलिन सातत्याने घेत आहेत आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला टोकाचा विरोध करत आहे. नरेंद्र मोदी यांनी आखून दिलेले कोणतेही धोरण अमलात आणायचे नाही, अशी टोकाची भूमिका घेणाऱ्यांमध्ये स्टॅलिन हे एक आहेत. देशाचे हित समोर ठेवले, तर स्टॅलिन यांना सत्तेपासून दूर करणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. त्यामुळे सध्याचे भाजपाचे प्राथमिक महत्वाचे उद्दिष्ट प्रमुख आणि स्टॅलिन यांना हरवणे, हे झाले असून भाजपाचे केंद्रीय नेतृत्व फक्त या दृष्टीने व्यूहरचना आखत आहे आणि तशी पावले टाकत आहे.
१९८८ मध्ये नेमके काय घडले?
थोडासा इतिहास पाहिला, तर १९८८ मध्ये अण्णाद्रमुक बरोबर युती करून भाजपाने तीन खासदार निवडून आणले होते. हे लक्षात घेतले तर त्यांच्याबरोबरील युती ही भाजपाला नेहमीच फायदेशीर ठरणार आहे असे दिसते आणि स्टॅलिन यांना हटवण्याचा तोच एकमेव मार्ग उरलेला आहे. अशा परिस्थितीत अन्नामलई यांच्या मतांचा आदर करीत भाजपा नेतृत्वाने त्यांना देश पातळीवर काही मोठी जबाबदारी देण्याचे ठरवून हा निर्णय घेतलेला आहे, असे स्पष्ट दिसत आहे. भाजपात गेली दहा वर्षे महत्वाच्या उद्दिष्टाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातात, व्यक्तीला समोर ठेवून घेतले जात नाहीत, हे पुन्हा सिदध झाले आहे.
देश उभारणीसाठी आणि विकासासाठी..
देश उभारणीसाठी किंवा विकसित भारतासाठी एखादा निर्णय घेताना कोणा व्यक्तीवर अन्याय झाला असेल, तर त्याची योग्य ठिकाणी वर्णी लावण्याचे तंत्र भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे चांगलेच अवगत आहे. त्यामुळे अन्नामलाई यांचे काय? या निरर्थक प्रश्नाकडे पाहत बसणे, एवढाच उद्योग विरोधकांकडे राहिला आहे, हे नक्की !
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा