ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

महसूलमंत्र्यांच्या भावासाठी चक्क बायपास वळवला; ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा

औरंगाबाद |  पैठण-औरंगाबाद रस्त्याचे चारपदरी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने डीपीआर तयार करून भूसंपादनासाठी थ्री-ए नोटिफिकेशनही प्रकाशित केले आहे. मात्र, यावेळी महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये गेवराई तांडा या गावाला गरज नसताना आणि गावकऱ्यांचा विरोध नसतानाही बायपासकरून धनदांडग्यांच्या जमिनीमधून रस्ता टाकण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंधूंच्या जमिनीचा सुद्धा यात समावेश असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

औरंगाबाद-पैठण या ५० किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरणाच्या सुरवातीला वेग आला असून, २४ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच हा रस्ता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण या रस्त्यावर गेवराई तांडा येथे थेट रस्ता असूनही गावाबाहेरून बायपास मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे धनदांडग्या लोकांना दुप्पट- चौपट दराने भूसंपादनाचा मोबदला मिळावा म्हणूनच हा रस्ता गरज नसताना गावाबाहेरून घेतला गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

रातोरात फळ झाडांची लागवड

गावाबाहेरून बायपास जाणार असल्याचे नोटिफिकेशन निघण्याच्या पंधरा दिवस अगोदर अनेक धनदांडग्या लोकांनी जमिनी खरेदी केल्याचं गावकऱ्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे उष्णतेची तीव्र लाट असताना २, ३ एप्रिलला या जमिनींवर आंब्याची मोठी झाडे लावण्याचे काम सुरू होते. मावेजा देताना फळझाडांचे मूल्यांकन अधिकचे येते, म्हणून फळझाडे लावली जातात असाही आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

‘आमचा कोणताही विरोध नाही’

औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण होत असल्याने गावातून रस्ता जाण्यासाठी आमचा कोणताही विरोध नसल्याचं गेवराई तांडा येथील गावकऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच आमच्या गावात रस्त्यावर कोणतेही अतिक्रमण नसून, रस्तासुद्धा सरळ आहे. त्यामुळे असं असतानाही कोट्यवधी रुपयांचा मोबदला देऊन जमीन संपादन करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थितीत केला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button