breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाराष्ट्रात भाजपा सरकार पाडणार?; फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले “पर्यायी सरकार…”

मुंबई |

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने पुन्हा विजयी चौकार लगावला आहे. उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या भाजपच्या ‘बुलडोझर’ने विरोधकांना भुईसपाट केलेच ; पण, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील सत्ताही राखत पक्षाने आपलीच लाट कायम असल्याचे सिद्ध केले. दरम्यान या विजयानंतर महाराष्ट्रातही सत्ताबदल होईल असा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. ‘युपी झांकी है, महाराष्ट्र बाकी है’ अशा घोषणाही भाजपा नेत्यांकडून देण्यात आल्या. दरम्यान यावर गोव्याच्या विजयाचे शिल्पकार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

“महाराष्ट्रात भाजपा सरकार पाडणार नाही, पण अंतर्विरोधामुळे पडले, तर भाजपा पर्यायी सरकार देईल,” असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आम्ही २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून राज्यात भाजपा स्वबळावर सत्ता मिळवेल, असा आत्मविश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. विधानसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार पाडण्याची मोहीम भाजप हाती घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना फडणवीस यांनी त्याचा ठामपणे इन्कार केला. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकत्रित मतेही नोटा पेक्षाही कमी असल्याने फडणवीस यांनी त्यांची खिल्ली उडविली आणि काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावरच लढविल्या जाणार आहेत.

  • काँग्रेसवर निशाणा!

“गोव्यात सर्वाधिक खर्च करणाऱ्या पक्षात पहिलं नाव काँग्रेसचं आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातून बॅगा भरून पैसे घेऊन लोक सरकार बनवण्यासाठी आले होते. पण लोकांनी भाजपावर विश्वास दाखवला आहे. संपूर्ण गोव्यात लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे. उत्तर गोव्यात ११ तर दक्षिण गोव्यात ९ जागा मिळाल्या”, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

  • आदित्य ठाकरे, राऊतांच्या सभेचं काय झालं?

गोव्यात आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी सेना-राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मोठी सभा घेतली होती. त्यानंतर देखील या युतीला गोव्यात खातं उघडता आलं नसल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी खोचक टोला लगावला आहे.”आदित्य ठाकरेंनी, संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात खूप मोठी सभा घेतली होती. आमचे मुख्यमंत्री पडणार असं देखील म्हटलं होतं. पण प्रमोद सावंतांच्या विरोधातील त्यांच्या उमेदवाराला फक्त ९७ मतं मिळाली आहेत”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button