breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? चंद्रकांत पाटील यांचं सूचक विधान; म्हणाले, “जर त्यांना सोबत यायचं असेल, तर…!”

मुंबई |

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाल्यानंतर भाजपाचा आत्मविश्वास चांगलाच वाढल्याचं दिसून येत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं असून पंजाबमध्ये आपनं काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून घेतली आहे. त्यामुळे एकीकडे देश पातळीवर ‘पुन्हा भाजपाच’ असं चित्र दिसत असताना महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ताबदल आणि भाजपा-शिवसेना युतीची चर्चा सुरू झाली आहे. त्याला एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी काल गोव्यात केलेलं विधान जसं कारणीभूत ठरलं, तसं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलं सूचक विधान देखील कारणीभूत ठरताना दिसत आहे.

  • काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल गोव्यात विजयानंतर बोलताना राज्यातील सत्ताबदलाविषयी भाष्य केलं होतं. “आम्ही २०२४ च्या दृष्टीने पूर्ण तयारी केली आहे. पण त्याआधी राज्यातलं सरकार पडलं, तर आम्ही सरकार स्थापन करू”, असं फडणवीस म्हणाले होते. यावरून चर्चा सुरू असतानाच चंद्रकांत पाटलांचं विधान आल्यामुळे या चर्चेत अजूनच भर पडली.

गुरुवारी संध्याकाळी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा तारखांविषयी विधान केलं. “मी दिलेल्या तारखांना बॉम्ब पडला, १० तारखेला चार राज्यं जिंकली आता पाहू, ११ तारखेला काय होतं ते पाहू”, असं पाटील म्हणाले होते. त्यानंतर एबीपीशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेसोबत युतीबाबत सूचक विधान केलं आहे.

  • “..तर आमची हरकत नाही”

शिवसेनेसोबत युतीबाबत बोलताना चंद्रकांत पाटलांनी आदित्य ठाकरेंच्या विधानाचा संदर्भ दिला आहे. “आदित्य ठाकरे म्हणाले की २०२४ला लाल किल्ल्यावर भगवा फडकेल. मी म्हटलं, भगवाच फडकेल, पण तो भाजपाचा असेल. तो फडकावण्यासाठी त्यांना सोबत यायचं असेल, तर त्याला आमची हरकत नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

  • “तोंड पोळलंय, ताक फुंकून प्यावं लागेल”

“शिवसेना ही काही आमची शत्रू नाही. काँग्रेससोबत सरकार करणं शक्यच नाही. शिवसेनेसोबत सरकार करणार का? या जरतरच्या गोष्टी आहेत”, असं पाटील म्हणाले. मात्र, यासोबतच, “तोंड खूप पोळलं, तर फुंकून प्यावं लागेल”, असं देखील पाटील यांनी नमूद केलं. “जो जिवंत माणूस आहे, त्यानं सातत्याने नवनव्या गोष्टींचं स्वागत करायला हवं. भाजपा कधीच मतावर अडून राहणारी नाही”, असं देखील ते म्हणाले.

  • “मी १० मार्च तारीख दिलीच नव्हती”

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ताबदलाबाबत आपण १० मार्च तारीख दिलीच नव्हती, असं पाटील यांनी म्हटलं आहे. “मी १० मार्च तारीख दिली नव्हती. मी म्हटलं होतं १० मार्चला भाजपाच्या बाजूने चांगले निकाल लागले, तर भाजपाचा आत्मविश्वास वाढेल. विरोधकांच्या मनात भीती निर्माण होईल. भविष्याविषयीची अशाश्वतता निर्माण होईल. कारण आज काँग्रेसमध्ये काम करणारा कार्यकर्ता कशाच्या जिवावर काम करतोय, ते मला कळत नाही. कारण त्यांना राहुल गांधींबद्दल भरवसा नाही. पंजाबमध्ये त्यांचं पानिपत झालं. उत्तर प्रदेशात बहुतेक एकच जागा आली. गोवा, उत्तराखंडमध्ये त्यांचं पानिपत झालं. त्यामुळे या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना आता आशा भाजपाची आणि मोदींची आहे. त्यामुळे मी म्हटलं होतं १० तारखेला चांगले निकाल लागल्यावर काहीतरी होईल”, असं पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button