breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मोठी बातमी: भाजपाकडून चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारीपदी शंकर जगताप यांची निवड!

पिंपरी | प्रतिनिधी 
भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी माजी नगरसेवक शंकर जगताप यांची निवड केली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक सहाय्यकपदी वाकड येथील संतोष कलाटे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शंकर जगताप आणि संतोष कलाटे यांना निवडीचे पत्र दिले आहे.

शंकर जगताप यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आहे. त्यांनी २०१७ ची महापालिका निवडणूक तसेच २०१४ आणि १०२९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रचार आणि पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी चांगले काम केले आहे. माजी नगरसेवक शंकर जगताप हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत. बंधू आमदार असले तरी त्यांनी कधीही राजकारणात बडेजावपणा मिरवलेला नाही. जमिनीवर राहून पक्ष कार्यकर्त्यांना ताकद देणे, पक्षाचे काम नागरिकांपर्यंत पोहोचवणे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा गरजू नागरिकांना लाभ मिळवून देणे तसेच आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांनी काम केले आहे. त्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपले मोठे सामाजिक कार्य उभे केलेले आहे.

या कामाची दखल घेऊन भाजपाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी शंकर जगताप यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी निवड केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या संघटन कौशल्याने भाजपाला मोठे यश मिळवून द्याल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी निवडीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले. २०१७ च्या निवडणुकीत महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपने गेल्या पाच वर्षात शहराच्या विकासाला गती दिली आहे. शहरातील नागरिकांसाठी उत्तम प्रकारे काम केले आहे.

दीड-दोन वर्षे कोरोनाचे संकट असतानाही महापालिकेमार्फत नागरिकांना मदत तसेच विकासकामे पूर्ण करण्यावर भाजपाने भर दिला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षात शहरात झालेल्या विकासकामांच्या जोरावरच आम्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी व माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते आगामी महापालिका निवडणुकीतही पुन्हा शत प्रतिशत भाजपचीच सत्ता आणू, असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button