breaking-newsपुणेमहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा

जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर, साधना वर्तक, उमेश कोठावदे (वाणी ) यांच्याविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी मानकर यांच्या विरोधात कोथरूड तसेच हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आदिती माधव दीक्षित (रा. प्रभात रस्ता, एरंडवणे) यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक माधवराव मानकर (रा. पार्थ क्लासिक, भांडारकर रस्ता), साधना जयवंत वर्तक (स्नेहा पॅरेडाईज, पौड रस्ता), वसुधा एंटरप्रायजेसचे भागीदार उमेश कोठावदे (वाणी)  (रा. पृथ्वी विनायक, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) यांच्याविरोधात फसवणूक तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षित यांची विमाननगर भागात जमीन आहे. दीक्षित यांच्या जमीन मिळकतीचा बनावट विकसन करारनामा विश्रांतवाडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आला होता.  बनावट करारनाम्याचा वापर मानकर, वर्तक, कोठावदे यांनी विविध शासकीय कार्यालयात केला. दीक्षित परदेशात असताना त्यांच्या अपरोक्ष कुलमुखत्यारधारक म्हणून वर्तक यांनी दीक्षित यांच्यावतीने स्वाक्षरी केली.

या व्यवहारातून मिळालेली रक्कम दीक्षित यांना न देता संगनमताने अपहार केला, असे दीक्षित यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक सायकर तपास करत आहेत.

मानकर यांच्याविरूद्ध सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली होती.

मोक्का कारवाईपाठोपाठ मानकर यांच्याविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच हडपसर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्य़ात आदिती दीक्षित तक्रारदार आहेत. या गुन्ह्य़ात मानकर यांच्यासह वर्तकदेखील आरोपी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button