breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडलेख

सिक्युरिटी प्रिकॉशन घ्या; मगच राज्यपालांना बोलवा!; पोलिस प्रशासनाचा सूचक संदेश

पिंपरी । रोहित आठवले

एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला सहज उपलब्ध होणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पिंपरी-चिंचवडचा नियोजित दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असले, तरी सिक्युरिटी प्रिकॉशन घ्या आणि मगच राज्यपालांना निमंत्रित करा, असा सूचक संदेशच पोलिस प्रशासनाने दिला आहे.
एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यक्रमासाठी राज्यपालांनी पुणे दौरा केला. लोणावळा येथील नियोजित कार्यक्रमानंतर पिंपरी-चिंचवडला होणारा कार्यक्रम रद्द करुन पुण्याच्या कार्यक्रमाकडे राज्यपालांचा ताफा वळला. परिणामी, शहरातील राजकीय व पोलिस वर्तुळात चर्चा सुरू झाली.
दरम्यान, ‘‘ महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे भाजपाचे प्रवक्ते आहेत’’ अशी टीका राज्यपाल कोश्यारी यांच्यावर विरोधी पक्षांकडून केली जाते. मात्र, महाराष्ट्राच्या इतिहासातील सहज उपलब्ध होणारे राज्यपाल म्हणून कोश्यारी परिचित आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या कार्यक्रमासाठी बोलविण्यास मोठी चढाओढ पाहायला मिळते. विविध संस्था, संघटना, पुरस्कार वितरण सोहळे, शैक्षणिक संस्थांच्या कार्यक्रमाला राजभवनातून थेट परवानगी मिळते. राज्याचे सर्वात मोठे संवैधानिक पद असलेला व्यक्ती सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहज उपलब्ध होतो, ही बाब स्वागतार्हच आहे.
मात्र, अतिमहत्वाच्या व्यक्तीमध्ये समावेश असलेल्या राज्यपालांना निमंत्रित करताना संयोजकांनी सुरक्षा आणि अन्य बाबींमध्ये अचूक काळजी घेतली पाहिजे. काही शिष्टाचार पाळावे लागतात. मोठ्या उत्साहात त्यांना बोलविताना नियोजनातील त्रूटींमुळे कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की येवू शकते. आयोजकांची फसगत होवू शकते, ही बाबही लक्षात घेतली पाहिजे.
चिंचवडमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत रविवारी एक पुरस्कार वितरण सोहळा नियोजित होता. त्याचे नियोजन आयोजकांकडून उत्तमरीत्या केले होते. पण, राज्यपाल येणार त्या कार्यक्रमात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची नीट पूर्तता झाली नसल्याचे पोलिस प्रशासनाच्या लक्षात आले. कार्यक्रमाला कोण उपस्थित असावे? किती लोकांना पास देण्यात आले आहेत? राज्यपाल जेथे बसतील? उभे राहून बोलतील तेथून प्रेक्षक किती अंतरावर असतील? याबाबत पूर्व नियोजनात त्रुटी असल्याचा अहवाल पोलिसांच्या एका खास विभागाने थेट महासंचालक कार्यालयाला पाठविला. त्यानंतर राज्यपाल कार्यालयाकडून राज्यपाल या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत, असा संदेश आयोजकांना मिळाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
पोलिस प्रशासनाचा सूचक इशारा…
राज्यपालांच्या कार्यक्रमाची वेळ थेट भवनातून निश्चित केली तरी सुरक्षा हा विषय पोलिस प्रशासनाकडून निश्चित केला जातो. आयोजक कोण? ते कोणाला पुरस्कार देणार आहेत? कार्यक्रम स्थळाची स्थिती आज तेथे येणारे कोण-कोण असतील? याची माहिती पोलिसांच्या एका खास विभागाकडून विशेष सुरक्षा विभागाला दिली जात असते. ही माहिती राज्यपाल भवनाकडे कळवली जाते, याचे भान आयोजकांना असावे, असा सूचक इशारा रविवारी प्रशासनाने दिला आहे.
कार्यक्रमस्थळी होती आंदोलनाची तयारी…
दरम्यान, या कार्यक्रमस्थळी काही संघटना आणि राजकीय पक्ष आंदोलनाच्या पवित्र्यात होते. परंतु, स्थानिक पोलिसांनी याची आवश्यक खबरदारी घेतली होती. संभाव्य आंदोलन लक्षात घेता काही आंदोलकांची एकदिवस आधी धरपकड केली गेली होती. आवश्यक बंदोबस्त सर्वत्र तैनात करण्यात आले होते. यापार्श्वभूमीवरही राज्यपालांचा नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button