breaking-newsराष्ट्रिय

53 वर्षांच्या कारकिर्दीनंतर अझिम प्रेमजी आज होणार निवृत्त

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजी आज निवृत्त होणार आहे. 74 वर्षांच्या अझिम प्रेमजी यांनी 53 वर्षांच्या कारकिर्दीनंतर कंपनीची धुरा आपल्या मुलाच्या म्हणजे रिषद प्रेमजी याच्या हाती सोपवली आहे. 31 जुलैपासून रिषद प्रेमजी कंपनीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत.

अझिम प्रेमजी आपल्या कंपनीचे कार्यकारी संचालक आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून संचालक मंडळात 2014 पर्यंत कार्यरत राहणार आहेत. अझिम प्रेमजी यांचा जन्म 24 जुलै 1945 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडिल हाशीम प्रेमजी हेदेखील एक उद्योगपती आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीदरम्यान, हाशीम प्रेमजी यांच्या वडिलांनी त्यांना पाकिस्तानमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्यांनी भारतातच राहणे पसंत केले. त्यांच्या पश्चात कंपनीची धुरा अझिम प्रेमजी यांनी स्वीकारली. अझिम प्रेमजी यांनी कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून आपले शिक्षण पूर्ण केले. वडिलांच्या निधनानंतर ते पुन्हा भारतात परतले आणि आपला व्यवसाय साभाळण्यास सुरूवात केली.

सुरूवातील विप्रो ही कंपनी वनस्पती तेल आणि साबणाच्या व्यवसायात अग्रगण्य मानली जायची. परंतु 1970 मध्ये प्रेमजी यांनी अमेरिकन कंपनी सेंटिनल कंम्प्युटर कॉर्पोरेशन या कंपनीसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर विप्रो आणि अझिम प्रेमजी यांनी मागे वळून पाहिले नाही. 1980 मध्ये प्रेमजी यांनी विप्रोला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी म्हणून ओळख मिळवून दिली आणि त्यानंतर कंपनी कंम्प्युटर सोबतच सॉफ्टवेअर सर्विसही देऊ लागली. आज विप्रो ही देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

2000 मध्ये अझिम प्रेमजी यांना मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन द्वारे मानद डॉक्टरेट देण्यात आले. 2006 मध्ये त्यांना नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग, मुंबई द्वारे लक्ष्मी बिझनेस व्हिजनरी पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त 2009 मध्ये त्यांना मिडलटाउन, कनेक्टिकटमधील वेस्लेयन विद्यापीठाने मानद डॉक्टरेटने सन्मानित केले होते. तसेच 2013 मध्ये लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार, म्हैसूर विद्यापीठाची मानद डॉक्टरेट अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त 2005 मध्ये अझिम प्रेमजी यांना पद्मभूषण तर 2011 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अझिम प्रेमजी हे देशातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच मे 2019 पर्यंत त्यांच्याकडे 21.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती होती. ‘द गिविंग प्लेज’च्या माध्यमातून त्यांनी आपली अर्धी संपत्ती दान करण्यावर सहमती दर्शवली आहे. तसेच अझिम प्रेमजी फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 2.2 अब्ज डॉलर्स दान केले आहेत. भारतातही त्यांनी शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. वॉरेन बफेट आणि बिल गेट्स यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेले अभियान ‘द गिविंग प्लेज’ अंतर्गत साइन अप करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button