breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमच्या घरांवर बुलडोझर फिरवणा-यांना घरी बसविणार; ‘रिंगरोड’ प्रकल्प बाधिताचा निर्धार

रिंगरोड प्रकल्प स्थलांतर करुन एकही घर बाधित होणार नाही, राहुल कलाटे यांची बाधितांना ग्वाही

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहरात बीआरटी प्रकल्पाचा बोजवारा उडाला आहे. कायबाह्य ठरलेला ‘रिंग रोड’ चिंचवडकरांच्या माथी मारला आहे. हजारो नागरिकांचा त्यास विरोध असताना सत्तेच्या जोरावर हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. साडेतीन हजार घरांवर बुलडोझर फिरवणा-यांना घरी बसवण्याचा निर्धार रिंगरोड बाधित नागरिकांना केला आहे. दरम्यान, आपण रिंगरोड बाधितांना न्याय देण्यास कटीबद्ध असून हा प्रकल्प स्थलांतरीत करु, एकाचेही घर बाधित होवू देणार नाही, अशी ग्वाही चिंचवडचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी आज ‘रिंग रोड’ बाधितांना दिली.

‘रिंग रोड’ आरक्षणात वाल्हेकरवाडी, थेरगाव, काळेवाडी, पिंपळे गुरव, कासारवाडी, नवी सांगवी भागातील जवळपास तीन ते साडेतीन हजारांपेक्षा अधिक घरे बाधीत ठरली आहे. रिंग रोड’साठी ही घरे हटविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यावर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासन कारवाई करत आहे. या प्रकल्पाला सुरूवातीपासून विरोध होत असून बाधितांनी विविध मार्गाने आंदोलन छेडले आहे.

थेरगाव येथे झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या सभेत बाधितांनी रोष व्यक्त केला होता. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत सोडून दिले. याबाबत कलाटे प्रचार फेरी दरम्यान बोलत होते.राहुल कलाटे पुढे म्हणाले की, सत्ताधारी भाजपमध्ये अनेक ‘टीडीआर किंग’ आहेत. ‘रिंग रोड’लगत सत्ताधारी पक्षातील काही पदाधिकार्यांच्या जमिनी आहेत.  ‘रिंग रोड’ झाल्यानंतर लगतच्या जमिनीला आपोआप भाव येणार आहे. शिवाय टीडीआर’चा व्यवसायातही तेजी येणार आहे. त्यामुळे हा ‘रिंग रोड’ व्हावा, असा सत्ताधारी पक्षातील काही स्थानिक पदाधिकार्यांचा अट्टहास आहे. त्यासाठी कारवाईच्या माध्यमातून धाकधपटशा सुरू आहे. ‘रिंग रोड’विरोधातील आंदोलन दडपण्यासाठी आंदोलकांमध्ये फुट पाडण्याचे कारस्थान करण्यात आले. परंतु, आपण हे खपवून घेणार नाही.

वास्तविकतः सद्यस्थितीत ‘रिंग रोड’ कालबाह्य झाला आहे. जनतेने आपल्याला एक संधी दिल्यास ‘रिंग रोड’ आपण स्थलांतरीत करुन दाखवू, व रिंगरोड बाधितांना न्याय देऊ, असा विश्वास कलाटे यांनी व्यक्त केला.घरांवर नांगर फिरवून मतदार संघाचा विकास होत नाही. संवेदना जपत, जनमताचा आदर करत कामे करावी लागतात. परंतु, मतदार संघात एककल्ली, हुकूमशाही कारभार सुरु आहे.

या कारभाराला सत्ताधारी पक्षातील नगरसेवक देखील वैतागले आहेत. मात्र, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यापलिकडे त्यांच्यासमोर पर्याय नाही. नागरिकांचीही हीच अवस्था आहे. विविध माध्यमातून रिंगरोड बाधित मागील अनेक वर्षांपासून आंदोलन करीत आहेत. मात्र, त्यांचा आवाज सत्ताधार्यांना ऐकू जात नाही. त्यामुळेच पंकजा मुंडे शहरात आल्यानंतर ‘रिंग रोड’बाधितांनी त्यांचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु, आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात आला. समोरच हा प्रकार घडत असताना भाजप नेते मूग गिळून बनले होते. मतदारांनी अशा नेत्यांना कायमचे घरी बसवावे, असे आवाहन कलाटे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button