breaking-newsमहाराष्ट्र

भाजपचे चक्रव्यूह भेदण्याचे यशोमती ठाकूर यांच्यापुढे आव्हान

अमरावती : राज्यपातळीवर काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये सामावून घेण्याचा कार्यक्रम सुरू असताना अमरावती जिल्ह्यात भाजपच्या गळाला अद्याप कुणी लागले नसले, तरी येत्या काही दिवसांमध्ये भाजप काँग्रेसपुढे चक्रव्यूह तयार करण्याची शक्यता असून तो भेदण्याचे आव्हान काँग्रेसच्या नवनियुक्त कार्याध्यक्ष अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्यासमोर आहे.

काँग्रेसने अखेर यशोमती ठाकूर यांच्यासह राज्यातील पाच अनुभवी नेत्यांच्या हाती कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवून समन्वय साधला आहे खरा; पण या नेत्यांपुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अनेक प्रश्न आहेत. विशेषत: यशोमती ठाकूर यांच्यापुढे विदर्भातील जुन्या-नव्या काँग्रेस नेत्यांना सोबत घेऊन पक्षसंघटना वाचवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून एकमेव काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. अनेक दिग्गज नेत्यांच्या जागा काँग्रेसने गमावल्या. विदर्भात काँग्रेसचे दहा आमदार आहेत. काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेल्या यशोमती ठाकूर यांच्याकडे विशेषत्वाने विदर्भाची जबाबदारी असण्याची शक्यता आहे. रसातळाला गेलेल्या काँग्रेसला अस्तित्वाची लढाई जिंकता यावी, म्हणून तरुणांच्या हाती नेतृत्व द्यावे, अशी सूचना राजकीय विश्लेषक करीत होते. त्यावरून काँग्रेसने बदलाच्या दिशेने पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.

अमरावती जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. यशोमती ठाकूर या तिवसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी आपली जागा राखली, तर वीरेंद्र जगताप हे धामणगाव रेल्वे मतदारसंघातून विरोधी लाटेतही निवडून आल्याने ही जागा काँग्रेसकडे कायम राहिली. आताच्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत राणा या निवडून आल्या असल्याने काँग्रेसला बळ मिळाले असले, तरी विदर्भातील अवस्था पाहता जिल्ह्याबरोबरच विदर्भात जागा वाढवण्यापेक्षा अस्तित्व टिकवून ठेवण्याचेच काँग्रेसपुढे मोठे आव्हान असणार आहे.

काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून स्वत:चा उमेदवार उभा करता आला नाही. ही जागा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला असल्याने या पक्षाच्या भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अपक्ष नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. त्या सध्या तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत आहेत. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचाही हट्ट पूर्ण करावा लागणार आहे. त्यांचा युवा स्वाभिमान पक्षाचा स्वतंत्र झेंडा आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा रंगणार आहे. अनेक जण इच्छुक असताना काँग्रेस पक्ष मजबूत करायला यशोमती ठाकूर यांना किती झगडावे लागणार आहे, याचा अंदाज येऊ शकतो. एखाद्या निवडणुकीत पक्षाचे चिन्हच नसल्याची किंमत काँग्रेसला अमरावतीत लोकसभा निवडणुकीत लक्षात आली. यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिवपद सांभाळले आहे. काँग्रेसची युवा सदस्य बांधणी करण्याचाही त्यांना अनुभव आहे. खासदार नवनीत राणा यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी केलेल्या परिश्रमांमुळे त्यांना राणा गटाचेही समर्थन मिळाले आहे. तरीही भाजपची पक्षविस्ताराची तयारी रोखण्यासाठी यशोमती ठाकूर यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button