‘शेतकऱ्यांचे पीककर्ज १०० टक्के माफ करा’; सतेज पाटील यांची मागणी, मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाईची मागणी
‘दिवाळीसाठी ₹५ हजार देऊन शेतकऱ्यांची चेष्टा’; कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनांवरून सरकारला जाब

पुणे : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राज्य सरकारकडे सरसकट पीककर्जमाफीची मागणी केली आहे. नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. कर्जवसुलीबाबत सरकारने स्पष्ट निर्देश दिले असताना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वसुली कशी केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील विजयानंतर पुण्यात आलेल्या सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
‘कर्ज पुनर्गठनाचा शेतकऱ्यांना काय फायदा?’
सतेज पाटील म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याची भूमिका मांडत आहे. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्नच बुडाले असेल, तर कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना कर्ज फेडणे कसे शक्य होणार? एका बाजूला सरकार कर्जमाफीची घोषणा करते आणि केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करते. याचा अर्थ शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केवळ कर्ज पुनर्गठन न करता शेतकऱ्यांचे पीककर्ज १०० टक्के माफ करावे, अशी आमची मागणी आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळीसाठी किमान २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून त्यांना सण साजरा करता येईल, असे पाटील म्हणाले.
हेही वाचा – राष्ट्रवादीत बैठकांचा धडाका! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला वरिष्ठ नेते; ५ मंत्र्यांच्या बदलाची चर्चा
मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करत सतेज पाटील यांनी संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कर्जवसुली करू नये, असे सरकार सांगत असताना या कंपन्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन वसुलीसाठी दबाव कसा आणतात? शेतकऱ्यांना त्रास दिला जात असेल, तर सरकारने त्यावर कारवाई करायला हवी, असे ते म्हणाले.
या प्रकरणी संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. एका कंपनीवर कठोर कारवाई झाली, तर इतर कंपन्यांनाही नियमांचे पालन करण्याचा संदेश जाईल, असे पाटील यांनी नमूद केले.
कृषी आणि सहकार विभागाच्या भूमिकेवर सवाल
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे किती झाले, याबाबत स्पष्ट माहिती समोर येत नसल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार विभागाच्या भूमिकेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कामकाजाची चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच, या प्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (SEBI) तक्रार करण्याची मागणीही त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत आणि कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.




