राष्ट्रवादीत बैठकांचा धडाका! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला वरिष्ठ नेते; ५ मंत्र्यांच्या बदलाची चर्चा
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या नेत्यांची वर्षा निवासस्थानी बैठक; अर्थखात्याच्या मागणीवरून राजकीय घडामोडींना वेग

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक होत आहे. दिवसभरात राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही दुसरी बैठक असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अर्थखात्याच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचल्याची माहिती आहे. अर्थखात्यावरून महायुतीतील राजकीय समीकरणे आणि आगामी निर्णयांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – वीकेंडला हेवी वर्कआउट करताय? सावधान! ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम केल्याने खांद्यांना होऊ शकतो त्रास
राष्ट्रवादीत पाच मंत्र्यांच्या बदलाची चर्चा
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच मंत्र्यांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पक्षातील संभाव्य फेरबदलांबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे. मात्र, या मंत्रिमंडळीय बदलांबाबत पक्षाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत नेमके कोणते मुद्दे चर्चेला येतात आणि अर्थखात्याच्या मागणीबाबत काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




