TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनोज जरांगेंनी मोठ्या प्रकरणाला वाचा फोडली; संजय राऊतांचा भाजपला जोरदार प्रत्युत्तर

मनोज जरांगेंच्या क्लिपवरून प्रसाद लाड यांनी चौकशीची मागणी केल्यानंतर राऊत आक्रमक; मल्लिकार्जुन खरगेंच्या विधानाचेही समर्थन

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्याकडे असलेली कथित क्लिप ठाकरे गटाच्या वॉररूममध्ये तयार करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला आहे. ही क्लिप संजय राऊत यांनीच तयार केली असून, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी लाड यांनी केली. या आरोपांवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. “उद्या यांना पोरं झाली तरी संजय राऊतांमुळे झाली, म्हणून बोंब मारतील,” अशा खोचक शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, मनोज जरांगे यांनी एका मोठ्या प्रकरणाला वाचा फोडली आणि राजकारण्यांचा विद्रूप चेहरा देशासमोर आणला. त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानू. मात्र, या प्रकरणातील क्लिप संजय राऊत यांनी तयार केली, असा आरोप करणे हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले.

“भाजपच्या लोकांना आता काही काम राहिलेले नाही. क्लिपमधील आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहेत. तरीही हे लोक उगाच काहीही बोलत आहेत. उद्या ते आणखी काहीही आरोप करतील. यांना मुलं झाली तरी त्याचे खापर संजय राऊतांवर फोडतील. या लोकांची पातळी इतकी खाली गेली आहे,” अशी टीका राऊत यांनी केली.

‘भाजपच्या नेत्यांची बुद्धी मातीची’

क्लिपमधील आवाज कोणाचे आहेत, असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी भाजपच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपच्या नेत्यांच्या बुद्धिमत्तेवरही त्यांनी टीका केली. “या लोकांना पैसा आणि सत्ता मिळाली आहे; त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. दिल्लीतील त्यांच्या बड्या नेत्यांचीही बुद्धी चालत नाही,” असे राऊत म्हणाले.

हेही वाचा –  खरगेंच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांचा सवाल; झाडतोड आणि अर्थखात्याच्या मागणीवरही भाष्य

खरगेंच्या विधानाचे समर्थन

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून देशात राजकीय वाद सुरू असताना संजय राऊत यांनी खरगे यांची बाजू घेतली. ग्रामीण भागात बोलताना वडिलांसाठी ‘बाप’ किंवा ‘म्हातारा’ असे शब्द वापरले जातात, असे त्यांनी सांगितले. भाजप या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“खरगे यांनी अनेक वर्षे राजकारणात उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. भाजपला रस्त्यावर उतरल्याने सहानुभूती मिळेल, असे वाटत असेल; पण तसे होणार नाही,” असे राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राऊत यांनी सरकारच्या सत्तेतून जाण्याबाबतही विधान केले. “मोदींनी यापूर्वी माझ्या आई-वडिलांबद्दलच्या वक्तव्यांचा उल्लेख केला आहे. मात्र, इथे कुणाच्या आई-वडिलांबद्दल बोलण्याचा प्रश्न नाही. हे सरकार सत्तेतून जाईल,” असे ते म्हणाले.

मनोज जरांगे यांच्याकडील कथित क्लिपवरून भाजप आणि ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group