Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘कायदेशीर मागण्यांसाठी चर्चेची दारे खुली’; जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

‘यापूर्वीही मार्ग काढला, पुढेही काढू’; राधाकृष्ण विखे पाटील जरांगेंच्या संपर्कात, दत्तात्रय भरणेंना एक-दोन दिवसांत तोडगा निघण्याचा विश्वास

नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. शनिवार, 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे त्यांचे उपोषण सुरू असून राज्यभरातून मराठा बांधव त्यांची भेट घेण्यासाठी दाखल होत आहेत. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी जरांगे यांनी सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईला येण्याचा इशारा दिला. तसेच 12 सप्टेंबरपर्यंत सरकारच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अंतरवाली सराटीतील आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरकारचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी असून ते मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहेत. यापूर्वीही सरकारने मार्ग काढला आहे आणि पुढेही मार्ग काढला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

चर्चेची दारे खुली आहेत’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत विचारले असता त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

‘जे काही आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनात सरकारचे प्रतिनिधी त्याठिकाणी आहेत. ते चर्चा करणार आहेत. यापूर्वीही आपण मार्ग काढला आहे आणि पुढेही आपण मार्ग काढणार आहोत,’ असे फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरुवातीपासूनच अतिशय संवेदनशीलतेने या विषयावर काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या मागण्या कायदेशीर आहेत, संविधानाच्या चौकटीत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या नाहीत, त्या सर्व मागण्यांवर चर्चेची दारे सरकारने खुली ठेवली आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  ‘शरद पवारांनी वेळीच साथ दिली नसती तर पडद्यामागे गेलो असतो’; अमृत महोत्सवी सोहळ्यात एकनाथ खडसेंचे भावुक उद्गार

एक-दोन दिवसांत तोडगा निघेल’

दरम्यान, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे. सरकार जरांगे यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून येत्या एक-दोन दिवसांत तोडगा निघेल, असा विश्वास कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदेंच्या परभणी दौऱ्याला जरांगेंचा विरोध

दुसरीकडे, परभणीत शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याने जरांगे यांनी कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच एकनाथ शिंदे यांनी परभणीत येऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी घेतली.

मात्र, जरांगे यांच्या दबावानंतरही बंडू जाधव कार्यक्रम घेण्यावर ठाम राहिले. त्याचवेळी एकनाथ शिंदे मुंबईहून परभणीच्या दिशेने रवाना झाले असून ते विमानाने नांदेड येथे पोहोचणार असल्याची माहिती आहे.

बच्चू कडूंच्या माध्यमातून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न

या घडामोडींदरम्यान शिंदे गटाकडून बच्चू कडू यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. बच्चू कडू यांनी जरांगे यांना फोन करून एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती दिली.

‘मला शिंदे साहेबांचा फोन आला. ते म्हणाले, जरांगे पाटील तुमचं ऐकतात का? या सगळ्या प्रकारामुळे शिंदे साहेबांना वाईट वाटले. हा कार्यक्रम मराठ्यांच्या विरोधात नाही,’ असे शिंदे यांनी सांगितल्याचे बच्चू कडू यांनी जरांगे यांना सांगितले.

बंडू जाधव यांनी कोणत्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे, याची आपल्याला माहिती नसल्याचेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता एकीकडे अंतरवाली सराटीतील जरांगे यांचे उपोषण आणि दुसरीकडे परभणीतील शेतकरी मेळावा, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button