TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साताऱ्यातील व्यक्तीचे पाकिस्तान कनेक्शन उघड

महाबळेश्वरमधून मोहम्मद शफीक लोनला अटक; ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंध असल्याचा पोलिसांचा दावा

सातारा : मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाला पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीला धमकी दिल्याच्या प्रकरणाचा तपास करताना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातून पाकिस्तानशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन (वय ३९, रा. महाबळेश्वर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने शनिवारी ही कारवाई केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाला प्रसिद्ध व्यावसायिक इम्तियाज खत्री यांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर २१ मेपासून त्यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून धमकीचे फोन येत होते. याप्रकरणी खत्री यांनी २२ जून रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या तपासादरम्यान शफीक लोनचे कथित पाकिस्तान कनेक्शन समोर आले.

तपासात शफीकचे वडील आणि दोन मोठे भाऊ पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याचा एक भाऊ २०१९ मध्ये पाकिस्तानात गेल्याचे आणि तो प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’मध्ये कमांडर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा –  गोकुळ निवडणुकीत पुन्हा न्यायालयीन ट्विस्ट; ४९२ दूध संस्थांचा मतदानाचा हक्क सर्वोच्च न्यायालयात

धमकीचे फोन आणि संदेश शफीकच्या मोबाइलमधून झाल्याचे पुरावे तपास पथकाला मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच शफीकने ‘फैयाज काश्मिरी’ नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीशी समाजमाध्यमातून संपर्क साधल्याचेही तपासात समोर आले आहे. काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांची माहितीही पोलिसांना मिळाली आहे.

पोलिसांनी शफीककडून दोन मोबाइल आणि एक डायरी जप्त केली आहे. त्याने मोबाइलमधील काही मजकूर हटवला असून, तो पुन्हा मिळवण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

शफीकला पुढील सखोल चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button