Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘शरद पवारांनी वेळीच साथ दिली नसती तर पडद्यामागे गेलो असतो’; अमृत महोत्सवी सोहळ्यात एकनाथ खडसेंचे भावुक उद्गार

भाजपमधील प्रदीर्घ राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा; ‘आताचं राजकारण पाहून वेदना होतात’ म्हणत नाथाभाऊंनी व्यक्त केल्या भावना

मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सवी सोहळा मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात उत्साहात पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री अरुणाभाई गुजराथी, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार आणि मंत्री उपस्थित होते.

या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासातील चढ-उतार, कटू प्रसंग आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे, त्यांनी कोणावरही थेट टीका केली नाही. मात्र, सध्याच्या राजकारणाबद्दल बोलताना त्यांच्या मनातील वेदना स्पष्टपणे जाणवत होत्या.

शरद पवारांनी मला आसरा दिला’

आपल्या भाषणाची सुरुवात मुक्ताईनगरला नमन करून करत एकनाथ खडसे म्हणाले की, जनतेने आपल्यावर अनेक वर्षे प्रेम केले. 1978 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली, त्यावेळी एका मताने पराभव झाला. त्यानंतर राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार आले.

खडसे म्हणाले की, अनेक वर्षे आपण भाजपचे काम केले. मात्र, राजकारणात आलेल्या बदलांच्या काळात शरद पवार यांनी आपल्याला आसरा दिला. काही काळ ब्रेक मिळाल्यानंतर शरद पवार यांनी आपल्याला पुन्हा राजकीय प्रवाहात आणले. ‘शरद पवारांनी मला वेळीच साथ दिली नसती, तर मी पडद्यामागे पडलो असतो,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

शरद पवारांविषयी पूर्वीपासून आकर्षण’

शरद पवार यांच्याविषयी आपल्याला पूर्वीपासूनच आकर्षण असल्याचे खडसे यांनी सांगितले. पवारांनी काढलेल्या कृषी दिंडीचीही त्यांनी आठवण सांगितली. महाराष्ट्रात आपण मोठे काम केले असेल, तर जलसंपदा विभागातील कामाचा त्यात मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राजकारणात फेरबदल होत असतात. अनेक वर्षे भाजपचे काम केले, मात्र आयुष्यात आणि राजकारणात बदल घडत असतात. अशा काळात शरद पवारांनी आपल्याला आशीर्वाद आणि साथ दिल्याचे खडसे म्हणाले.

हेही वाचा – इमरान हाश्मीला स्वाइन फ्लू; H1N1 रिपोर्ट पॉझिटिव्ह, बंगळुरूचा कार्यक्रम केला रद्द

आताचं राजकारण पाहून वेदना होतात’

एकनाथ खडसे यांनी भाजपमधील आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यासोबतच्या राजकीय संबंधांचा उल्लेख करत त्यांनी जुन्या राजकारणाची आठवण सांगितली.

2000 ते 2014 या काळात राज्यात भाजपचे सरकार नसतानाही पक्षाच्या संघटनेचा पाया मजबूत होता. त्यामुळे पुढे भाजपला चांगले दिवस आले, असे खडसे म्हणाले. प्रमोद महाजन यांनी आपल्याला राजकीय बळ दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मात्र, ‘आताचं राजकारण पाहून मला वेदना होतात. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण आणि आताचं राजकारण यात फार बदल झाला आहे,’ असे खडसे म्हणाले.

मुक्ताई मंदिराच्या निधीचा मुद्दा

मुक्ताई मंदिराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर केला असून त्यातील सुरुवातीचा निधीही मिळाल्याचे खडसे यांनी सांगितले. ‘मंदिराचा निधी अडवण्याचे पाप मी आतापर्यंत केले नाही,’ असे ते म्हणाले.

मुक्ताई मंदिराला गेल्या सात वर्षांपासून निधी मिळालेला नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. कोण आले आणि कोण गेले याची आपल्याला चिंता नाही; जनतेचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे, असेही खडसे यांनी सांगितले.

‘मी चुकलो असेल, कुणाला दुखावले असेल तर माझ्या चुका सुधारू,’ असे म्हणत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात साथ देणाऱ्या जनतेचे आभार मानले.

नाथाभाऊ शतायुषी व्हावेत’

या सोहळ्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकीय योगदानाचे कौतुक केले. 1990 मध्ये एकनाथ खडसे यांचा विधिमंडळात प्रवेश झाला. भाजपचा विस्तार करण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली. सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केले, तसेच जलसंधारणाच्या क्षेत्रातही योगदान दिले, असे जयंत पाटील म्हणाले.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या हिंमतीवर खडसे यांनी राजकीय प्रवास केला. ‘खडसे हे शतायुषी व्हावेत. रोहिणीताई आणि रक्षा ताई त्यांचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत,’ असे जयंत पाटील यांनी सांगितले.

सरकारवर तुटून पडणारा नेता म्हणजे नाथाभाऊ’

दिलीप वळसे पाटील यांनीही एकनाथ खडसे यांच्या संघर्षमय राजकीय प्रवासाचे कौतुक केले. ‘सरकारवर तुटून पडणारा नेता म्हणजे नाथाभाऊ. ते संघर्षमय नेते आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला एकनाथराव खडसे यांचा परिचय आहे,’ असे ते म्हणाले.

1990 मध्ये एकाच वेळी विधानसभेत निवडून आलेल्या नेत्यांमध्ये खडसे यांचा समावेश होता. विरोधी पक्षनेते असताना त्यांची भाषणे अत्यंत आक्रमक असायची, अशी आठवणही वळसे पाटील यांनी सांगितली.

रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे या पुन्हा समाजसेवेत सक्रिय झाल्याचा उल्लेख करत, त्यांनी शरद पवारांचा आदर्श ठेवावा आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात, अशा शुभेच्छाही दिल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button