TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला गिरीश महाजनांचा विरोध; म्हणाले, “गणेशोत्सवात ही वेळ योग्य नाही”

१५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर उपोषणाचा निर्धार

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्या उपोषणाचा आज १५वा दिवस आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांची बैठक घेत जरांगे यांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केली. येत्या १५ सप्टेंबरला ते अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करणार असून, १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

जरांगे यांच्या मुंबईकडे जाणाऱ्या आंदोलनाच्या नियोजनानुसार १५ सप्टेंबरला बीड जिल्ह्यातील पाटोदा, १६ सप्टेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, १७ सप्टेंबरला पुण्यातील हडपसर आणि १८ सप्टेंबरला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे आंदोलकांचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर मुंबईत दाखल होऊन १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर उपोषण करण्यात येणार आहे.

दरम्यान, जरांगे यांच्या आंदोलनावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारचे बोलणे सुरू आहे. मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना उपोषण, आंदोलन आणि मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. मात्र, गणेशोत्सवाचा काळ हा आंदोलनासाठी योग्य नाही,” असे महाजन यांनी म्हटले.

हेही वाचा –  गोकुळ निवडणुकीत पुन्हा न्यायालयीन ट्विस्ट; ४९२ दूध संस्थांचा मतदानाचा हक्क सर्वोच्च न्यायालयात

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. महिला आणि मुलेही मोठ्या संख्येने रस्त्यावर असतात. त्यामुळे जरांगे यांनी आंदोलनाची वेळ टाळण्याचा विचार करावा, असे आवाहन महाजन यांनी केले.

दरम्यान, मुंबईतील आंदोलनासाठी परवानगी आवश्यक असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. परवानगीशिवाय आंदोलन करता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले असून, जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे आता राज्य सरकारकडून जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाला परवानगी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम असल्याने आगामी काळात सरकार आणि मराठा आंदोलकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button