मराठा आरक्षणावर तोडग्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला
विखे पाटील, उदय सामंत, शंभूराजे देसाई आणि प्रसाद लाड अंतरवाली सराटीत करणार चर्चा; २९ ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असताना सरकारने चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई आणि आमदार प्रसाद लाड यांचे शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. या भेटीत मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा दिल्याने सरकारच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आंदोलनाची तीव्रता वाढण्यापूर्वी चर्चेतून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.
उदय सामंत आज जरांगे पाटलांची भेट घेणार
उद्योगमंत्री उदय सामंत सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचल्यानंतर थेट अंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहेत. दुपारी सुमारास ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करणार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सरकारचे इतर प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होणार आहेत.
हेही वाचा – अमरावती रुग्णालयातील आगीत ३ नवजातांचा मृत्यू; आरोग्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
२९ ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हालचाली
मराठा आरक्षणाच्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. पुढील टप्प्यात मुंबईत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिल्याने सरकारची चिंता वाढली आहे.
संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानाचीही पाहणी करण्यात आली आहे. मागील आंदोलनादरम्यान पावसामुळे निर्माण झालेला चिखल, व्यासपीठाची जागा आणि माध्यम प्रतिनिधींसाठी उपलब्ध जागा यांसारख्या अडचणी लक्षात घेऊन यंदा नियोजन करण्यात येत आहे. आंदोलकांच्या येण्या-जाण्याच्या मार्गाचीही पाहणी करण्यात आली आहे.
अंतरवाली सराटीतही आंदोलनाची तयारी
दरम्यान, अंतरवाली सराटीत आंदोलनाची तयारी वेगाने सुरू आहे. गोदाकाठच्या १२३ गावांतील समाजबांधवांची बैठक घेऊन आंदोलनाच्या नियोजनाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आंदोलकांसाठी अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
प्रत्येक घरातून एक स्वयंसेवक आंदोलनात सहभागी व्हावा, तसेच आंदोलनस्थळी सकाळ-संध्याकाळ भाकरी पाठवावी, अशा सूचनाही जरांगे पाटील यांनी दिल्या आहेत.
त्यामुळे सरकारचे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील चर्चेतून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघतो का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




