Miss Universe India 2026 : केरळची 19 वर्षीय काझिया लिझ मेजो ठरली ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’
जयपूरमध्ये रंगलेल्या भव्य सोहळ्यात मनिका विश्वकर्माने काझियाला घातला मुकुट; नोव्हेंबरमध्ये प्युर्टो रिको येथे भारताचे प्रतिनिधित्व करणार

जयपूर : केरळची १९ वर्षीय काझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये झालेल्या भव्य अंतिम सोहळ्यात ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2025’ मानिका विश्वकर्मा हिने काझियाला मुकुट घालून तिच्याकडे हा किताब अधिकृतपणे सोपवला.
या विजयानंतर काझियाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये प्युर्टो रिको येथे होणाऱ्या ७५व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
वैष्णवी गणेश आणि अनुश्री सातवळेकर टॉप 3 मध्ये
अंतिम फेरीत तमिळनाडूची वैष्णवी गणेश आणि गुजरातची अनुश्री सातवळेकर यांनी अनुक्रमे इतर स्थान पटकावले. यंदाच्या स्पर्धेत एकूण ५२ स्पर्धक सहभागी झाले होते. अनेक महिन्यांच्या ऑडिशन्स, मुलाखती आणि विविध प्राथमिक फेऱ्यांनंतर या स्पर्धकांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले.
अंतिम पाचमध्ये तमिळनाडूची वैष्णवी गणेश, महाराष्ट्राची तेजस्विनी श्रीवास्तव, केरळची काझिया लिझ मेजो, गुजरातची अनुश्री सातवळेकर आणि उत्तराखंडची अनुभा वशिष्ठ यांचा समावेश होता.
हेही वाचा – अमरावती रुग्णालयातील आगीत ३ नवजातांचा मृत्यू; आरोग्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
40 सेकंदांच्या भाषणाने जिंकले परीक्षकांचे मन
अंतिम फेरीत काझियाने ४० सेकंदांत आपले समारोपाचे भाषण प्रभावीपणे सादर केले. तिच्या आत्मविश्वासपूर्ण कामगिरीमुळे तिने अंतिम स्पर्धेत बाजी मारली आणि ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा मुकुट आपल्या नावे केला.
सुष्मिता सेनच्या नेतृत्वाखाली परीक्षक मंडळ
या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दिग्गज परीक्षक मंडळ उपस्थित होते. भारताची पहिली ‘मिस युनिव्हर्स’ सुष्मिता सेन हिने परीक्षक मंडळाचे नेतृत्व केले. १९९४ मध्ये सुष्मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला होता.
माजी ‘मिस युनिव्हर्स इंडिया’ विजेत्या सेलिना जेटली, उर्वशी रौतेला आणि रिया सिंघा यांच्यासह प्रज्ञा कपूर, विशा लाढिया, ॲना ब्लँको आणि डॉ. स्तुती खरे शुक्ला यांचाही परीक्षक मंडळात समावेश होता.
आता काझिया लिझ मेजो नोव्हेंबरमध्ये प्युर्टो रिको येथे होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2026 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.




