दिल्लीत हृदयद्रावक घटना! ९ वर्षांच्या मुलीचा कार्डिॲक अरेस्टमुळे मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज समोर

नवी दिल्ली | दिल्लीतील मयूर विहार फेज २ येथील एका नामांकित शाळेत मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षांच्या चिमुकलीचा वर्गात अचानक कोसळल्याने मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिला ‘कार्डिअॅक अरेस्ट’ (हृदयक्रिया बंद पडल्याने) आल्याचे सांगितले आहे. ‘लव्हली हेरिटेज स्कूल’मध्ये घडलेल्या या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, या प्रकरणी मुलीला वेळेवर प्रथमोपचार व सीपीआर (CPR) देण्यात आला नाही, असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, ९ वर्षांची ही विद्यार्थिनी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत हसत-खेळत पायऱ्या चढून वर्गाच्या दिशेने येते. वर्गात पोहोचल्यानंतर इतर मुले आपापल्या जागेवर बसत असतात. ही मुलगी उभी राहून शिक्षिकेच्या दिशेने काहीतरी सांगण्यासाठी पुढे जाते. मात्र, काही पावले चालताच ती अचानक जमिनीवर कोसळते. मुलगी कोसळताच वर्गातील मुले आणि शिक्षिका तिच्याकडे धाव घेतात. खाली पडल्याने तिच्या हनुवटीला मार लागून रक्त येत असल्याचेही दिसले.
हेही वाचा
अमेरिकेत मोठा राजकीय भूकंप; मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांच्या पक्षाचा दारुण पराभव
9-year-old Indian girl DIES after collapsing in Delhi classroom
Police are investigating — the school principal says she suffered a cardiac arrest, the exact cause of death is yet to be established https://t.co/DUU3QSI5Xx
— RT (@RT_com) November 4, 2026
घटनेनंतर वर्गशिक्षिका आणि शाळा प्रशासनाने तातडीने विद्यार्थिनीला उचलून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती; डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. दुसरीकडे, मुलीच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मुलीला वेळीच सीपीआर दिला गेला नाही आणि प्राथमिक उपचारात हलगर्जीपणा झाला, असा दावा त्यांनी केला आहे.
मुख्याध्यापिका काय म्हणाल्या?
या घटनेवर शाळेच्या मुख्याध्यापिका भावना मलिक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले. “मुलगी खाली पडताच शिक्षिकेने क्षणाचाही विलंब न लावता तिला उचलले आणि रुग्णालयात नेले. तिच्या हनुवटीतून रक्त येत होते. आम्ही तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र डॉक्टरांनी तिला कार्डिअॅक अरेस्ट आल्याचे सांगितले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून यामुळे संपूर्ण शाळेला मोठा धक्का बसला आहे,” असे त्या म्हणाल्या. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.




