Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीमहाराष्ट्र

अमरावती रुग्णालयातील आगीत ३ नवजातांचा मृत्यू; आरोग्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

अमरावती : जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत तीन नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.

घटनेची माहिती घेतल्यानंतर मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, रुग्णालयात नेमका स्फोट झाला की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, हे चौकशीनंतर स्पष्ट होईल. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून नवजात बालकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने तीन बालकांना वाचवता आले नाही.

आगीतून बचावलेल्या काही नवजात बालकांना उपचारासाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. त्यातील काही बालकांवर खासगी, तर काहींवर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती सुरक्षित असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.

हेही वाचा –  एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; पीएनजी कनेक्शन वाढवणार

ही घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दुपारपर्यंत अमरावतीला पोहोचण्याचे सांगितले. त्यांच्यासोबत आरोग्य सचिव डॉ. निपुण यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी जाणार आहेत. ते रुग्णालयाची पाहणी करून घटनेची सविस्तर माहिती घेणार असून, मृत नवजातांच्या पालकांचीही भेट घेणार आहेत.

दरम्यान, माजी खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी या दुर्घटनेतील दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले होते की नाही, याची माहितीही नवनीत राणा यांनी मागितली. पाहणीनंतर त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून घटनेबाबत चर्चा केली.

या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था कितपत सक्षम होती आणि फायर ऑडिट झाले होते का, याबाबतच्या चौकशीनंतर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button