breaking-newsमहाराष्ट्र

३०० कोटींच्या घोषणेने दानवे अडचणीत

  • निवडणूक आयोगाला अहवाल सादर, कारवाईची शक्यता

अहमदनगर शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून ३०० कोटी रुपये देऊ, अशी घोषणा करून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार शिवसेनेने निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे. द्विवेदी यांनी या तक्रारीची चौकशी करून राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला आहे. अहवालावरील कार्यवाहीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोगाचे मार्गदर्शन मागितले आहे. अहवाल तपासून योग्य निर्णय लवकरच घेऊ, असे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सांगितले आहे.

भाजपच्या सर्व ६६ उमेदवारांच्या एकत्रित प्रचाराची सुरुवात गेल्या रविवारी झाली. सावेडी उपनगरात झालेल्या प्रचारसभेत प्रदेशाध्यक्ष दानवे यांचे भाषण झाले. जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी आदी उपस्थित होते. सभेत दानवे यांनी नगर शहराच्या विकासासाठी ३०० कोटी रुपये देण्याचा उल्लेख केला. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार शिवसेनेच्या वतीने पक्षाचे माजी आमदार अनिल राठोड तसेच अपक्ष उमेदवार केतन रतिलाल गुंदेचा यांनी केली. निवडणूक रणधुमाळीत राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांपैकी केवळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांचीच नगरमध्ये प्रचारसभा झाली. या पहिल्याच सभेतील वक्तव्याने दानवे अडचणीत आले आहेत.

प्रचारसभेसाठी आचारसंहिता कक्षाचे भरारी पथक व्हिडीओसह उपस्थित होते. सभेतील दानवे यांच्या भाषणाची ध्वनिचित्रफीत निवडणूक यंत्रणेतील या पथकाकडून मागवून तपासण्यात आली. ‘‘महापालिका जर आपल्या (भाजपच्या) ताब्यात आली व आपला महापौर निवडून आला तर, त्याच दिवशी याच ठिकाणच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांना आणून, त्यांच्या हस्ते महापौरांचा सत्कार करून दिलीपरावांनी (खा. गांधी) सांगितलेला ३०० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांना शहरासाठी जाहीर करायला लावू, असे मी वचन देतो,’’ असे दानवे पहिल्याच सभेत बोलल्याचे निष्पन्न झाले.

दानवे यांचे हे वक्तव्य निवडणुकीतील आश्वासन आहे की घोषणा, याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना अहवाल पाठवला आहे. हा अहवाल गोपनीय असल्याचे सांगत निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त द्विवेदी यांनी त्यातील तपशील सांगण्यास नकार दिला. तसेच अहवाल आयोगाला पाठवला असल्याची माहिती दिली. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया शुक्रवारी नगरमध्ये होते. अहवाल तपासून योग्य तो निर्णय लवकरच देऊ, असे त्यांनी सांगितले.

अहवाल तपासून निर्णय घेऊ – सहारिया

महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया आज, शुक्रवारी नगर शहरात होते. भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाल्याकडे सहारिया यांचे लक्ष वेधले असता, निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त द्विवेदी यांनी आयोगाला अहवाल पाठवल्याची माहिती दिली. त्यावर अहवाल तपासून निर्णय घेऊ, असे उत्तर त्यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button