breaking-newsमहाराष्ट्र

‘आता शेतकरीच सत्तापालट करतील’

  • शरद पवारांचे भाकित, शेतीप्रश्नांवर विरोधकांचे ऐक्य

मागण्या मान्य करा किंवा सत्ता सोडा, असा घोष करीत हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा शुक्रवारी राजधानीत थडकला. या मोर्चाच्या निमित्ताने सर्व विरोधकांनी ‘किसान मुक्ती मोर्चा’च्या व्यासपीठावर एकत्र येत मोदींविरोधात हल्लाबोल केला. शेतकरीच आता सत्तापालट घडवतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

राजधानीत शुक्रवारी संसद मार्गावर जमलेल्या हजारो शेतकऱ्यांसमोर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला दीडपट भाव या दोन्ही विधेयकांना संसदेत पाठिंबा देण्याचे आश्वासनही या नेत्यांनी दिले! ही विधेयके मंजूर करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

‘देशातील शेतकरी मोदी सरकारकडे भीक नव्हे, तर हक्क मागत आहेत, पण त्यांच्या वाटय़ाला फक्त आश्वासनेच आली आहेत. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. न्यायासाठी कायदा बदलण्याची गरज असेल तर तोही बदलला जाईल. शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जातील,’ अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. २१० शेतकरी संघटनांच्या ‘अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती’च्या सभेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, शरद यादव, कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी. डी. राजा, सपाचे धमेंद्र यादव याशिवाय, तेलुगू देसम, राष्ट्रीय लोकदल, जनता दल (सं) असे विविध विरोधी पक्षांचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

मतांतून कौल

‘पंतप्रधान मोदी देशातील १५ श्रीमंत उद्योजकांचे साडेतीन लाख कोटींचे कर्ज माफ करू शकतात तर शेतकऱ्यांचे कर्ज का माफ होत नाही? शेतकरी आणि तरुणांची अवस्था बिकट असून श्रमाचे पैसे मिळत नाहीत, नोकऱ्या मिळत नाहीत. त्यांना न्याय देणे हीच मोदी सरकारविरोधातील लढाई आहे’, असे सांगत राहुल गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी आणि भाजपविरोधात कौल देण्याचे आवाहन केले.

शरद पवार म्हणाले, ‘‘तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेटून त्यांचे दु:ख जाणून घेतले होते, मात्र मोदी सरकार उद्योजकांचे असून शेतकऱ्यांबद्दल त्यांना कणव नाही.’’ केंद्र सरकारविरोधात एकत्र येऊन न्याय मिळवणे हाच आता एकमेव पर्याय आहे. देशातील शेतकरी गप्प बसणार नाहीत. संधी मिळेल तेव्हा शेतकरीच सत्तापालट करतील, असा इशाराही पवार यांनी दिला.

शेतमालाला दीडपट भाव देण्याची स्वामीनाथन आयोगाची शिफारस मोदी सरकारने लागू केली नाही तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शेतकरीच धडा शिकवतील. केंद्र सरकारची विमा योजना बोगस असून विमा कंपन्या लूट करत आहेत, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. ‘निवडणुकीतील आपल्या मताचे महत्त्व ओळखा’, असे आवाहन फारूक अब्दुल्ला यांनी शेतकऱ्यांना केले.

पाठिंबा देणाराच मित्र!

सभेच्या पहिल्या सत्रात शेतकरी संघटनांनी मोदी सरकारच्या शेती धोरणावर हल्ला चढविला. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण केले नाही. ही मागणी मान्य केली नाही तर सत्ता सोडावी लागेल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला. ‘नरेंद्र मोदी किसानविरोधी’, असा नारा देत योगेंद्र यादव यांनी, शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांनाच मित्र माना, असे आवाहन केले. शेतकरी एकटा नाही. विद्यार्थी, डॉक्टर, वकील हा मध्यमवर्गही आता शेतकऱ्यांबरोबर आहे, असे पी. साईनाथ म्हणाले.

‘मोदी-शहा आणि कौरव’

दुर्योधन-दु:शासन हे दोन कौरव उपद्रवी होते. आत्ताही मोदी-शहा हे दोन कौरव आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. पण शेतकरीरूपी पांडव त्यांचा पराभव करतील, असा शाब्दिक प्रहार सीताराम येचुरी यांनी केला. गरीब शेतकऱ्याच्या खिशातील पैसे चोरून त्यांनाच परत करण्याचा साळसूदपणा मोदी दाखवत आहेत. त्यांची ही नीती म्हणजे तुमच्याच पाकिटातून दान देण्याचा आव आणणाऱ्या पाकीटमारासारखी आहे, अशी टीका येचुरी यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button