breaking-newsमुंबई

मुलुंड कचराभूमी बंद!

  • ‘बायोकल्चर’ प्रक्रिया करून जमीन मोकळी करणार; मुंबईच्या कचऱ्याचा भार देवनार, कांजूरमार्ग कचराभूमींवर

मुलुंड तसेच ठाणे, नवी मुंबईतील काही भागांना गेल्या अनेक वर्षांपासून छळणारी दरुगधी आणि प्रदूषण आता कायमस्वरूपी नाहीसे होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून खितपत पडलेला मुलुंड कचराभूमी बंद करण्याचा प्रश्न अखेरीस मार्गी लागला असून येत्या दोन दिवसांत येथे कचरा टाकणे थांबवण्यात येणार आहे. कचराभूमीवर ‘बायोकल्चर’ प्रक्रिया करून ही जमीन मोकळी करण्यात येणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे मुलुंडवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, मुंबईतील दीड हजार टन अतिरिक्त कचऱ्याचा भार आता देवनार आणि कांजूरमार्ग या कचराभूमींवर पडणार आहे.

मुंबई महापालिकेने १९६७पासून मुलुंड येथे कचराभूमी सुरू केली. मात्र, आजतागायत या कचराभूमीत जमा होणाऱ्या कचऱ्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे पालिकेला शक्य झालेले नाही. या कचराभूमीमुळे निर्माण होणारी दरुगधी आणि प्रदूषणाचा त्रास केवळ मुलुंडकरच नव्हे तर ठाणे, नवी मुंबईतील लगतच्या परिसरांतील नागरिकांनाही सोसावा लागत होता. नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागल्यामुळे या कचराभूमीविरोधात वेळोवेळी आंदोलनेही करण्यात आली. कचरावाहू वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी हादेखील कळीचा मुद्दा ठरू लागला होता. या पाश्र्वभूमीवर मुलुंड आणि देवनार येथील कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा निर्णय महापालिकेने काही वर्षांपूर्वी घेतला. मात्र, या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदारांनी योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे त्यांना दिलेले कंत्राट पालिकेला रद्द करावे लागले होते.

या कचराभूमीतील कचऱ्यावर बायोकल्चर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. ही कचराभूमी सोमवारपासूनच कंत्राटदाराच्या ताब्यात देण्यात येणार होती. मात्र, संयुक्त सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले नसल्याने हा निर्णय लांबणीवर पडला. येत्या दोन-तीन दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करून कचराभूमीवर ‘बायोकल्चर’ प्रक्रिया सुरू केली जाईल. या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी पालिकेला ५५८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

मुलुंड कचराभूमी बंद झाल्यामुळे तेथे दररोज टाकण्यात येणाऱ्या तब्बल १५०० मेट्रिक टन कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न पालिकेसमोर निर्माण झाला आहे. त्यावर पालिकेने तोडगा काढला असून १५०० मेट्रिक टनापैकी एक हजार मेट्रिक टन कचरा देवनार कचराभूमीत, तर ५०० मेट्रिक टन कचरा कांजूर कचराभूमीत टाकण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button