breaking-newsमुंबई

मेट्रो स्थानकांत स्थानिक वैशिष्टय़े झळकणार

  • परिसरातील गुणवैशिष्टय़ांवर आधारित संकल्पचित्र

‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’कडून (एमएमआरडीए) शहरात बांधण्यात येणाऱ्या मेट्रो मार्गिकांमधील स्थानकांमध्ये स्थानिक परिसराची वैशिष्टय़े झळकणार आहेत.

दहिसर (पू) ते अंधेरी या ‘मेट्रो ७’ मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे सर्वप्रथम या मार्गिकेवरील स्थानकांवर हा प्रयोग करण्यात येईल. यामध्ये प्रत्येक स्थानकाच्या अंतर्गत भागात त्या त्या परिसरातील गुणवैशिष्टय़ांवर आधारित संकल्पचित्र आणि इतर आकर्षक बाबी तयार करण्यात येणार आहेत.

शहरातील विविध भागांमध्ये सध्या मेट्रोच्या कामाने जोर पकडला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरीच्या पुढे दहिसर (पू.) ते अंधेरी (मेट्रो ७) या मेट्रो मार्गिकेचे तर सांताक्रूझ विभागासह दक्षिण मुंबईत कुलाबा- वांद्रे- सीप्झ (मेट्रो ३) या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. शिवाय अंधेरीमधील न्यू लिंक रस्त्यावर दहिसर (पू.) ते डी. एन. नगर (मेट्रो २ अ) आणि डी. एन. नगर ते मानखुर्द (मेट्रो २ ब) या मार्गिका अस्तित्वात येणार आहेत. मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ या दोन्ही मार्गिकांचे ६० टक्के काम पूर्ण  झाले आहे. या दोन्ही मार्गिकांच्या स्थानकांसह मेट्रो २ ब मार्गिकेतील स्थानकांचा विकास हरित स्थानक म्हणून करण्याच्या निर्णय ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने घेतला आहे. यातच स्थानकांची रूपरेषा त्या त्या विभागातील गुणवैशिष्टय़ांवर आधारित करण्यात येणार आहे.

मेट्रो ७ मार्गिकेमधील स्थानकांवर हा प्रयोग करण्यात येणार आहे. १६.५ किमी असलेल्या या मार्गिकेवर एकूण १३ स्थानके आहेत. ही मार्गिका अंधेरी, गोरेगाव, बोरिवली अशा महत्त्वाच्या विभागांमधून जाणार आहे. त्यामुळे या विभागाची गुणवैशिष्टय़े मेट्रो स्थानकांवर दाखविण्यात येतील. यामध्ये अंधेरी विभागातील मेट्रो स्थानकांची रूपरेषा ‘बॉलीवूड’ या संकल्पनेवर करण्यात येणार आहे, तर बोरिवलीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असल्याने तेथे ‘वन’ ही संकल्पना असेल. गोरेगावमधील स्थानके ‘चित्रनगरी’ या संकल्पनेवर आधारित असतील. याशिवाय मेट्रो स्थानकांमध्ये लावण्यात येणाऱ्या टाइल्स तुटल्यास त्यांच्या दुरुस्तीकरिता अधिकचा खर्च करावा लागतो.  भविष्यात हा खर्च टाळण्यासाठी स्थानकांमध्ये ग्रॅनाइट बसविण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे.

मेट्रो स्थानके आकर्षक असतील यासाठी विभागानुरूप संकल्पनेवर आधारित मेट्रो स्थानकांची निर्मिती करण्यात येणार आहे.   – प्रवीण दराडे, अतिरिक्त महानगर आयुक्त, एमएमआरडीए

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button