breaking-newsक्रिडा

महान गिर्यारोहक कामी रिता शेर्पाचे पुण्यात आगमन

“गिरिप्रेमी’च्या विशेष कार्यक्रमासाठी कामी उपस्थित राहणार
गिर्यारोहक व उद्योजक मिंग्मा शेर्पा व विंग कमांडर देविदत्ता पांडा यांचीही विशेष उपस्थिती

पुणे: जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर तब्बल 22 वेळा यशस्वी शिखर चढाई करणारे महान गिर्यारोहक कामी रिता शेर्पा यांचे आज पुण्यामध्ये आगमन झाले. ते “गिरिप्रेमी’च्या कांचनगंगा इको एक्‍स्पेडिशनच्या निमिताने आयोजित विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. कामी याच्यासोबतच जगातील सर्व 14 अष्टहजारी शिखरांवर चढाई करणारे पहिले नेपाळी तसेच दक्षिण आशियाई व्यक्‍ती व सेव्हन समिट ट्रेक्‍स या नेपाळमधील प्रमुख शेर्पा एजन्सीचे सर्वेसर्वा मिंग्मा शेर्पा व विंग कमांडर देविदत्ता पांडा, उपप्राचार्य, हिमालयन ाउंटनियरिंग इन्स्टिट्यूट, दार्जिलिंग हे देखील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक 17 जुलै रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता, कन्नड संघ सभागृह, डॉ. शामराव कलमाडी हायस्कूल, गणेश नगर, एरंडवणे, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. सहा वर्षांमध्ये 14 पैकी 6 अष्टहजारी शिखरांवरील यशस्वी मोहिमांनंतर “गिरिप्रेमी’ आता भारतातील सर्वात उंच शिखर “माउंट कांचनगंगा’वर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नागरी मोहीम घेऊन जाणार आहे.जेष्ठ गिर्यारोहक, एव्हरेस्टवीर व एडमंड हिलरी यांच्या साथीने माउंट एव्हरेस्टवर प्रथम चढाई करणारे शेर्पा तेनझिंग नोर्गे यांचे सुपुत्र जामलिंग नोर्गे यांच्या उपस्थितीत मोहिमेची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्ष मोहीम 2019 सालामध्ये जाणार आहे, त्या निमित्ताने वर्षभर अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून याच शृंखलेचा एक भाग म्हणून हा विशेष कार्यक्रम घेण्यात येत आहे.

या विशेष कार्यक्रमाचा विशेष अतिथी असणारे कामी रिता शेर्पा यांनी 1994 मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात माल वाहतूक करणारा पोर्टर म्हणून होती. गेल्या तीन दशकात कामीने पोर्टर ते सर्वाधिक वेळेस एव्हरेस्ट चढणारा व्यक्ती असा अभूतपूर्व प्रवास पूर्ण केला. त्यांनी रोप फिक्‍सिंग टीम’ व 8000 मीटरवर असलेल्या साउथ कॉल-डेथ झोन येथे “हाय अल्टिट्यूड वर्कर’ म्हणून देखील काम पाहिलेआहे.
सध्या 48 वर्षांचा असलेल्या कामीने वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत कार्यरत राहण्याचे ठरविले आहे. म्हणजे अजून सहा मोसमात तो एव्हरेस्ट चढाई करू शकतो, किंबहुना 30 वेळेला एव्हरेस्ट चढण्याचा विक्रम प्रस्थापित करू शकतो. मात्र, कामीसाठी गिर्यारोहण हा एक ध्यास आहे, तो कोणत्याही विक्रमासाठी हे काम करत नाही. अशा या विलक्षण व्यक्तिमत्वाला भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची अभूतपूर्व संधी पुणेकरांनी साधावी, असे आवाहन “गिरिप्रेमी’ने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button