धक्कादायक! सहायक पोलीस आयुक्तांविरुद्ध खंडणीचा गुन्हा
पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत असलेले सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्याविरुद्ध ४० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी भुईंज ( ता. वाई) पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाई येथे नुकत्याच झालेल्या एका गोळीबार प्रकरणात काही तरुणांना अटक करण्यात आलेली आहे. यातीलच एका तरुणाने हुंबरे यांच्याविरुद्ध ही तक्रार दिली आहे.
या तक्रारीनुसार हुंबरे हे भुईंज पोलीस ठाण्यात आले होते. या वेळी गोळीबार प्रकरणातील काही संशयितांना चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीनंतर हुंबरे यांनी संबंधित संशयितांना दूरध्वनी करत त्यांना भुईंज बस स्थानकावर येण्यास सांगितले. तक्रारदार आणि त्याचा मित्र तेथे गेले असता हुंबरे यांनी या प्रकरणी पुढील कारवाई न करण्यासाठी प्रत्येकी पन्नास हजारांची मागणी केली. या वेळी प्रत्येकी वीस हजार रुपये अशी तडजोड होत त्या दोघांकडून ४० हजार रुपयांची खंडणी घेत हुंबरे निघून गेले. पुढे या प्रकरणात फसवणूक झाल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तक्रार दाखल केली.