breaking-newsपुणेमहाराष्ट्र

तांदूळ निर्यातीमधील भारताचे स्थान घसरले

आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तान, थायलंडला पूरक स्थिती

आखाती राष्ट्रे, ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडामधून सर्वाधिक मागणी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय तांदूळ विक्रीमध्ये असलेले वर्चस्व यावर्षी भारताला गमवावे लागले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांतील एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत बासमती तसेच बिगर बासमती तांदुळाच्या निर्यातीत घट झाली आहे. भाववाढीनंतर बासमती तांदुळाच्या निर्यातीत गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत १.७० टक्के घट झाली. ही घट तुलनेत छोटी वाटत असली तरी शेजारील थायलंड, पाकिस्तान आणि व्हिएतनाम या तांदूळ निर्यातदार राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विस्तारण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे.

बासमती बरोबरच बिगर बासमती तांदुळाची देशातून होणारी निर्यात घटली आहे. गेल्यावर्षी ६५ लाख टन एवढी बिगर बासमती तांदुळाची निर्यात झाली होती. चालू आर्थिक वर्षांत ५६ लाख टन एवढी बिगर बासमती तांदुळाची निर्यात झाली. बिगर बासमती तांदुळाच्या निर्यातीतून १५ हजार  ५३० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. शासनाने तांदुळाचे हमीभाव २०० रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे तांदुळाच्या दरात यंदा भाववाढ झाली. बिगर बासमती तांदुळाच्या भावात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्य़ांनी वाढ झाली , अशी माहिती फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि जयराज आणि कंपनीचे संचालक राजेश शहा यांनी नोंदविले.

यंदाच्या खरीप हंगामात तांदुळाचे उत्पादन ९९२ लाख टन झाले आहे. गेल्या वर्षी तांदुळाचे उत्पादन ९७५ लाख टन एवढे होते. बिगर बासमती, बासमती  तांदुळाचे उत्पादन देशात चांगले झाले होते. तांदुळाच्या निर्यातीतून परकीय चलन मिळते म्हणून बिगर बासमती तांदुळाच्या निर्यात वाढीसाठी शासनाने नोव्हेंबर महिन्यात ‘मर्चेटाईन एक्सपोर्ट फोरम इंडिया’ ही योजना सुरु केली. त्याअंतर्गत बिगर बासमती तांदुळाच्या निर्यातीवर ५ टक्के अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, या योजनेला तितकासा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसत आहे, असेही शहा यांनी सांगितले.

यंदाच्या आर्थिक वर्षांत बिगर बासमती तांदुळाची निर्यात ८० लाख टन एवढी होईल, असा अंदाज आहे. बासमती तांदुळाची निर्यात चालू आर्थिक वर्षांत ४० लाख टन होईल, असा अंदाज असल्याचेही शहा म्हणाले.

नक्की घट किती?

या वर्षांत डिसेंबर अखेरीपर्यंत देशभरातून २८.६० लाख टन एवढी बासमतीची निर्यात झाली. गेल्या आर्थिक वर्षांत बासमती तांदुळाची निर्यात २९.१० लाख टन एवढी झाली होती. बिगर बासमती तांदुळाच्या निर्यातीतही १४ टक्क्यांनी घट झाली. यंदा तांदळाच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्यात घटली.

प्रतिस्पर्धी देशांना फायदा

भारतात तांदुळाच्या भावात वाढ झाली आहे. त्याचा फायदा तांदूळ निर्यातीतील  प्रमुख प्रतिस्पर्धी देश असलेल्या पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम  या  प्रमुख तांदूळ उत्पादक देशांना झाला आहे. पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम या देशांनी जागतिक बाजारात तांदुळाची निर्यात वाढविली आहे. त्यामुळे भारतातील निर्यातीत घट झाली आहे, अशी माहिती राजेश शहा यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button