breaking-newsपुणेमहाराष्ट्र

ठेकेदारांच्या अनेक बसेस नादुरुस्त

  •  तपासणी अहवालातून माहिती उघड : 12 प्रकारच्या समस्या असल्याचे आले समोरे

पुणे – वारजे पुलावरील बस अपघातानंतर पीएमपीएमएलने तातडीने ठेकेदारांकडून चालवण्यात येणाऱ्या सर्व बसेसची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सर्व 13 आगारांना सूचना देऊन अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या या तपासणी अहवालात ठेकेदारांच्या अनेक बसेस नादुरुस्त असून क्वार्टर पीन नसणे, गिअर ऑईल न बदलणे, वॉलकप, वायपर नसणे, खराब खिडक्‍या अशा छोट्या-मोठ्या विविध 12 प्रकारच्या समस्या असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता तरी प्रशासनाकडून ठेकेदारांवर कडक कारवाई केली जाणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

काही दिवसांपुर्वी मुंबई-पुणे महामार्गावर वारजेला जाणाऱ्या जोड रस्त्यावर पीएमपीएमएल बस पुलावरून कोसळून अपघात झाला. यामध्ये 25 ते 30 प्रवासी जखमी झाले होते. अपघातातील बस ही ठेकेदारांची कंत्राटी बस असून स्टेअरिंगचा रॉड निसटल्याने अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी अहवालातून समोर आले होते. अपघातानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी तातडीने पाऊले उचलत ठेकेदारांकडून चालवण्यात येणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यासंबंधी सर्व डेपो मॅनेजरला सूचना देऊन अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार डेपो मॅनेजर, वरिष्ठ वाहनचालक आणि एक अभियंता यांच्याकडून गेल्या 20 ते 22 दिवसांपासून डेपोतून सुटणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी केली जात होती. ही तपासणी पूर्ण झाली असून यामध्ये बहुतांश बस या नादुरुस्त असून विविध 12 प्रकारच्या समस्या असल्याचे समोर आले आहे. यामध्ये खिडक्‍यांना काचा नसणे, वायपर, नादुरुस्त वॉलकप, बीआरटी दरवाजा, गिअर ऑईल, स्टिअरींग ऑईल वेळोवेळी न बदलणे, खराब बंपर अशा प्रकारच्या समस्या असल्याचे अहवालातून समोर आले आहे. अहवाल पाहणीनंतर ठेकेदारांना तातडीने बस दुरुस्त करण्याचे सांगण्यात आले असून येत्या तीन ते चार दिवसांत ठेकेदारांची बैठक बोलवण्यात आल्याचे पीएमपीएमएलमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.
——————–
-अशाप्रकारे करण्यात आली तपासणी
पीएमपीच्या ताफ्यात ठेकेदारांकडून चालवण्यात येणाऱ्या बसेसची संख्या 653 आहे. मात्र, यापैकी प्रत्यक्ष रस्त्यावर 450 एवढ्याच बसेस आहेत. वारजे येथे झालेल्या अपघातानंतर या सर्व बसेसची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार प्रत्येक डेपोतील डॅपो मॅनेजर, वरिष्ठ ड्रायव्हर आणि एक अभियंता यांच्याकडून ही तपासणी करण्यात आली. यामध्ये गाडी बाहेर सोडण्या अगोदर ती चालवून पाहाणे, सर्व्हिसिंग, ब्रेक, क्‍लच, गिअर, स्टेअरिंग, टायर आदींची तपासणी करण्यात आली. यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
—————–
ठेकेदाराच्या ताब्यातील सर्व बसेसची तपासणी करण्यात आली असून अहवाल प्राप्त झाला आहे. नादुरूस्त आणि चालवण्यास अयोग्य बसची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. ठराविक वेळेत बसदुरुस्ती न झाल्यास नियमापेक्षा जास्त दंड आकारण्यात येणार आहे.
– नयना गुंडे, व्यवस्थापकीय संचालिका, पीएमपीएल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button