breaking-newsपुणेमहाराष्ट्र

सिग्नल 247, अभियंता मात्र एकच

  • समन्वय नाही : सततच्या बिघाडांमुळे “डोक्‍याला ताप’
  • – पोलिसांना करावे लागते “मॅन्युअली’ वाहतूक नियमन

पुणे – पावसाळा लागला, की शहरातील सिग्नल यंत्रणा बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ होते. ऐन पावसात सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतुकीचा फज्जा उडून पोलिसांना “मॅन्युअली’ वाहतूक नियमन करावे लागते. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील सिग्नल यंत्रणा बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे बेशिस्त वाहतुकीला चालना मिळत आहे. दरम्यान, शहरातील 247 सिग्नल दुुरुस्तीसाठी महापालिकेकडे अवघा एक अभियंता असून यामुळे सिग्नल यंत्रणेची वेळेवर दुरुस्ती होत नाही. परिणामी वाहतूक पोलिसांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून 350 चौकात सिग्नल यंत्रणा कार्यन्वित आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहतूक नियमन केले जाते. यासाठी विविध चौकात 1 हजार 400 वाहतूक पोलीस तैनात आहेत. इतर मोसमाच्या तुलनेत पावसाळ्याध्ये वाहतूक कोंडीत भर पडते. दुचाकीपेक्षा चारचाकी वाहनांचे वाढलेले प्रमाण, बेशिस्त वाहनचालकांमुळे नागरिकांना दरदिवशी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यातच भर म्हणून गेल्या काही दिवसांपासून शहरातील सिग्नल यंत्रणेत बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विविध भागातील दिवसाला सरासरी तीन ते चार सिग्नल बंद पडत असल्याचे दिसून आले. ऐन पावसात हे सिग्नल बंद पडल्याने वाहतूक पोलिसांना “मॅन्युअली’ नियमन करावे लागत आहे. बंद सिग्नल यंत्रणेमुळे वाहनांच्या लांब रांगा लागतात. याचे व्यवस्थित नियमन करण्यासाठी एकाच्या ठिकाणी दोन कर्मचारी नियुक्त करावे लागत आहेत. परिणामी, वाहतूक पोलिसांवर याचा ताण पडत असल्याचे दिसून येते. सिग्नल दुरुस्तीचे काम महापालिकेच्या विद्युत विभागाकडून केले जाते. मात्र, शहरातील 247 सिग्नल सिग्नलदुरुस्तीसाठी पालिकेकडे अवघा एक अभियंता असून त्याच्याकडूनच दुरुस्तीचे काम केले जात असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडल्यास ती पूर्ववत करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागत आहेत. परिणामी बंद सिग्नलमुळे वाहतूक र्कोंडी होत असून याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
——————–
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठिकठिकाणी वाहतूक कर्मचारी तैनात आहेत. पावसाळा असल्याने शहरातील सिग्नल यंत्रणा बंद पडत आहेत. मात्र, यासंदर्भात महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दरम्यान, सिग्नल बंद पडल्यामुळे मॅन्युअली वाहतूक नियंत्रित करताना काही प्रमाणात वाहतुकीचा वेग मंदावला जात आहे. परंतु अशावेळी वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून व्यवस्थिपणे नियमन केले जाते आहे. .
– शेषराव सूर्यवंशी, प्रभारी वाहतूक उपायुक्त
——————-
गेल्या काही दिवसात बंद पडल्याचे निदर्शनास आलेले काही सिग्नल
– अलका चौक
– जूना बाजार चौक
– येरवड्यातील गोल्फ चौक
– डेक्कन चौक
– संचेती चौक
– शिवाजीनगर मुख्य चौक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button