breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शहराध्यक्षपदासाठी ‘चढाओढ’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रणनितीमुळे इच्छुक सक्रीय

वाघेरे, लांडे, गव्हाणे, काटे, शितोळे झाले कमालीचे आक्रमक

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे- पाटील यांचा शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. सहा वर्षांहून अधिककाळ वाघेरे-पाटील यांनी शहर राष्ट्रवादीचे नेतृत्त्व सांभाळले आहे. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपदी नवीन चेहरा निवडण्यासाठी पक्षश्रेष्ठींची खलबते सुरु झाली आहेत. त्यामुळे इच्छुक नेत्यांमध्ये कमालीची स्पर्धा सुरू आहे.
विशेष म्हणजे, महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे नेते आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते यांच्यात मिलीभगत आहे. त्यामुळे भाजपाविरोधात आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते बोटचेपी भूमिका घेतात, असे निरीक्षण पक्षश्रेष्ठींचे आहे. त्यामुळे भाजपाविरोधात आवाज उठवून पक्षाची आक्रमक भूमिका मांडणारा आणि पक्ष संघटनेचे काम करणाऱ्या चेहऱ्याला मोठी जबाबदारी देण्यात येईल, असा अप्रत्यक्ष संदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
परिणामी, शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे कमालीचे आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे, शहराध्यक्षपदी नवीन नियुक्ती करण्यापेक्षा संजोग वाघेरे-पाटील यांच्या नेतृत्त्वाखालीच महापालिका निवडणूक लढवावी, अशी भूमिका विद्यमान विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी घेतली आहे.
दरम्यान, इच्छुकांनी आपआपल्या परीने पक्षश्रेष्ठींकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे. दुसरीकडे, महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या चुकीच्या कामांवर बोट ठेवत आव्हान निर्माण केले आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते ‘ॲक्टिव्ह’ झाल्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.
तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी शहराध्यक्ष आणि दोन कार्यकारी अध्यक्ष असा ‘फॉर्म्युला’ वापरण्यात येईल, असा अंदाज राजकीय जाणकारांचा आहे.
लांडे- गव्हाने यांच्या सक्रीयतेमागे विधानसभेचे गणित…
शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले माजी आमदार विलास लांडे भोसरी विधानसभेतील आहेत. या मतदार संघात लांडे यांना २०१४ आणि २०१९ असा दोनदा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आता २०२४ मध्ये विजयश्री खेचून आणायची असेल, तर २०२२ मध्येच आपल्या विचाराचे जास्तीत- जास्त नगरसेवक निवडून आणावे लागणार आहेत. त्यासाठी पक्षसंघटनेतील महत्त्वाची जबाबदारी असणे महत्वाचे आहे. भोसरीतील ज्येष्ट नगरसेवक अजित गव्हाने यांना २०१९ मध्येच विधानसभा तिकीट घेण्याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी गव्हाने यांनी तिकीट नाकारले. पण, लांडे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यास गव्हाने या मतदार संघावर दावा करणार आहेत. त्यामुळे लांडे आणि गव्हाने यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, भोसरीत पक्षाला अधिकृत उमेदवार देता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
चिंचवडमध्ये काटे, पवार, कलाटे यांच्यामध्ये स्पर्धा…
चिंचवड विधानसभा मतदार संघात २०१९ मध्ये माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पक्षाचे तिकीट नाकारले होते. माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांना उमेदवारी मिळणार, असे निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी त्यांनीही निवडणूक लढवली नाही. चिंचवडमध्ये पक्षाला अधिकृत उमेदवार देता आला नाही. आता महाविकास आघाडी सरकार सत्तेत असल्यामुळे २०२४ मध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद निश्चितपणाने भाजपापेक्षा जास्त राहणार आहे. ही बाब इच्छुकांनी हेरली आहे. त्यामुळे पक्षसंघटनेतील महत्त्वाची जबाबदारी घेवून जास्तीत-जास्त नगरसेवक आपल्या सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि पार्थ पवार यांचे निष्ठावंत अशी ओळख असलेले संदीप पवार यांचेही नाव चर्चेत आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे नाराज नगरसेवक राहुल कलाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळी राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला होता. राहुल कलाटे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असाही सूर आहे.
पिंपरीतून राजू बनसोडे, सुलक्षणा धर यांचा एकला चालो रे…
पिंपरी विधानसभा मतदार संघात आमदार अण्णा बनसोडे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे बनसोडे चर्चेत आहेत. या मतदार संघात नगरसेविका सुलक्षणा शिलवंत- धर यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी त्यांना अर्ज मागे घ्यावा लागला. राष्ट्रवादीतीलच काही मंडळींनी सुलक्षणा धर-शिलवंत यांचे काम करण्यास नकार दिला होता. आता पक्षश्रेष्ठींकडून धर-शिलवंत यांना ताकद दिली जात आहे. नगरसेवक राजू बनसोडे यांनीही पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे पक्षसंघटनेत बनसोडे आणि धर-शिलवंत यांना जबाबदारी देण्यात येईल, अशी चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button