केरळच्या काँगेस पक्षात बंडखोरी ?

तिरूवनंतपुरम : केरळमधील काँग्रेस जिंकू शकणारी एकमेव राज्यसभा जागा मित्रपक्ष असणाऱया केरळ काँगेस मणीगट या मित्रपक्षाला दिल्याने राज्यात काँगेस पक्षामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी यासंबंधी एक खरमरीत पत्र काँगेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवले आहे.
राज्यसभेवर पुन्हा आपली निवड व्हावी, अशी आपली इच्छा नाही. आपण पदाच्या शर्यतीत नाही. मात्र ही जागा मित्रपक्षाला देण्याचे कारण नव्हते. त्याऐवजी काँगेसमधीलच नव्या चेहऱयाला संधी द्यावयास हवी होती. कुरियन यांचा राज्यसभा कालावधी लवकरच संपणार आहे. त्यामुळे तेथे निवडणूक होणार आहे.
या जागेसाठी काँगेस पक्षात मोठी चुरस आहे. माजी प्रदेशाध्यक्ष व्ही. एम. सुधीरन, युवक काँगेस नेते डीन कुरियाकोस आणि स्वतः कुरियन हे स्पर्धेत असल्याचे बोलले जाते. ही जागा मित्रपक्षाला देणे ही सपशेल शरणागती आहे, अशी टीका कुरियाकोस यांनी केली. त्यामुळे काँगेस अध्यक्ष गांधी यांच्यासमोर पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ नेत्यांबरोबरच आठ तरूण आमदारांनीही नाराजी व्यक्त केली. पक्षातील काही नेत्यांनी मित्रपक्षाबरोबर कटकारस्थान करून ही जागा सोडणे भाग पाडले, असा आरोप त्यांनी केला आहे. काँगेस पक्षश्रेष्ठींची या संदर्भात दिशाभूल करण्यात आली, असेही बोलले जात आहे. हा संघर्ष येत्या तीन चार दिवसात अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.