breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मुलाच्या कौतुकासाठी पेढे घेऊन जाणा-या आईवर पिंपरीत भरदिवसा गोळीबार

पिंपरी (महाईन्यूज) – हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीच्या कामगार वसाहतीमध्ये एका महिलेवर गोळीबार झाला. ही घटना आज (शनिवारी) दुपारी पावणे एकच्या सुमारास एच. ए. स्कूलच्या उपहारगृहाजवळ घडली. त्या महिलेवर दोन गोळ्या झाडल्या. परंतू, सुदैवाने महिलेला कसलीही इजा झाली नाही. त्या महिलेचा मुलगा दहावीची परीक्षा पास झाल्याने त्याचे कौतुकासाठी पेढे घेऊन जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
शितल फिलिप सिकंदर (वय 35, रा. गांधीनगर, पिंपरी) असे गोळीबार झालेल्या महिलेचे नाव आहे. अज्ञात आरोपींविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 8) इयत्ता दहावीचा निकाल लागला. शीतल यांच्या मुलाने दहावीची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेत मुलगा चांगल्या गुणांनी पास झाला. शुक्रवार पासून मुलाच्या यशाचे कौतुक घरभर सुरु होते. एच ए स्कूल जवळ असलेल्या नाशिककर यांच्या दुकानात नाशिकचे प्रसिद्ध पेढे मिळतात. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने नाशिककर यांच्या दुकानात पेढे घेण्यासठी येतात. आज शीतल त्यांच्या एका महिला मैत्रीणीसोबत दुपारी साडेबाराच्या सुमारास एच ए कंपनी वसाहतीमध्ये पेढे घेण्यासाठी आल्या.
पावणेएकच्या सुमारास पेढे घेऊन पायी जात असताना पल्सर दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. त्यातील एकाने शीतल यांच्यासोबत असलेल्या महिलेला बाजूला करून शीतल यांच्यावर पिस्टलमधून गोळी झाडली. पहिली गोळी शीतल यांना लागली नाही. त्यामुळे आरोपीने पुन्हा एक गोळी झाडली. सुदैवाने दुसरी गोळी देखील लागली नाही. दरम्यान, शीतल यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. पकडले जाण्याची शक्यता लक्षात येताच दोन्ही आरोपींनी पल्सर मोटारसायकल वरून धूम ठोकली.
शीतल यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. यामध्ये त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना तात्काळ पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शीतल यांना मानसिक धक्का बसला असल्याने फिर्याद दाखल करण्याचे काम सायंकाळ पर्यंत चालू होते.  या घटनेची माहिती परिसरातील नागरिक बळवंत सुर्वे यांनी 100 नंबरवर फोन करून पोलिसांना कळविली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, सन 2014 मध्ये शीतल सिकंदर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दिली होती. त्यामुळे त्या घटनेचा आज घडलेल्या घटनेशी काही संबंध आहे का ? यामागे राजकीय किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ? गोळीबार केलेल्या आरोपींची शीतल यांच्याशी वैयक्तिक दुश्मनी आहे की त्यांना कोणी पाठवले आहे ? अशा विविध शक्यतांच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत. घटनास्थळी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सतीश कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक निमगिरे, पोलीस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे, बॉम्ब शोधक पथकाचे अधिकारी यांनी भेट दिली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button