breaking-newsमहाराष्ट्र

महाराष्ट्र पोलिसांची एसआयटी परशुराम वाघमारेची चौकशी करणार

  • कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण 

कोल्हापूर – ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या एसआयटीकडून परशुराम वाघमारेची चौकशी होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची कबुली देणाऱ्या परशुराम वाघमारेचा ताबा घेण्यासाठी महाराष्ट्र एसआयटी बंगळुरुला जाऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणार आहे. कालच कॉम्रेड गोविंद पानसरे यांची स्नुषा मेघा पानसरे यांनी संशयित आरोपी परशुराम वाघमारेला महाराष्ट्र पोलिसांच्या SIT ने ताब्यात घेऊन चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी परशुराम वाघामारेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

एसआयटीचे अधिकारी कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात आहेत. गौर लंकेश हत्येप्रकरणी आधी मे महिन्यात तिघांना अटक करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरुला जाऊन त्यांची चौकशी केली होती. आता परशुराम वाघमारेचीही चौकशी करण्यासाठी एसआयटीची टीम जाणार आहे. त्यात पुणे, मुंबई आणि कोल्हापूरच्या पोलिसांचा समावेश असणार आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरलेली बंदूकच एमएम कलबुर्गी आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी वापरल्याचे कर्नाटक पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर सांगितले. पानसरे यांच्या हत्येसाठी दोन पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता. त्यातील एक पिस्तुल गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आली, तर दुसरी पिस्तुल डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आल्याचे कर्नाटक पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे वाघमारेची एसआयटी कसून चौकशी करणार आहे.

वाघमारेसह त्याच्या साथीदारांचे पाच वर्षांतील सीडीआर, त्यांच्याशी असलेली जवळीक, वास्तव्याचे ठिकाण, त्यांचा वावर याचीही प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे. परशुराम वाघमारेसह साथीदारांचा यापूर्वी कोल्हापूरशी संपर्क आला होता का? स्थानिक पातळीवरील कोणाबरोबर संपर्क आला होता? याचीही माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही अप्पर पोलिस महासंचालकांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button