breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

महाविकास आघाडी सरकारचा कोकणवासीयांसोबत दुजाभाव: विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची टीका

मुंबई । प्रतिनिधी

महाविकासआघाडी सरकारने दाखवलेल्या उदासीनतेमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या कोकणवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागला, असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. या निमित्ताने शिवसेनेचे कोकणवासीयांबद्दलचे प्रेम पुतना मावशी सारखे असल्याचे सिद्ध झाले आहे,  असेही श्री. दरेकर यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आ. भाई गिरकर, आ. प्रसाद लाड, आ. मिहीर कोटेचा आणि आ. पराग अळवणी आदी उपस्थित होते.

श्री. दरेकर म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लोकांना विलगीकरण काळासाठी 12 ऑगस्टपूर्वी पोहोचणे गरजेचे होते. तशी नियमावली खुद्द राज्य सरकारने घोषित केली होती.  त्यानुसार रेल्वेने 23 जुलै रोजी विशेष रेल्वे सोडण्याची तयारी दर्शविली होती. पण राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हि विशेष रेल्वे वेळेत सुरू होऊ शकली नाही. रेल्वेने सातत्याने पाठपूरावा केल्यानंतर राज्य सरकारने या रेल्वेस मंजूरी दिली. परंतू विलगीकरणाच्या अटीमुळे बहुतांशी लोकांनी आर्थिक भूर्दंड सहन करत खासगी वाहणांने किंवा एसटी बसने प्रवास केला. परिणामी उशीरा सोडण्यात आलेल्या रेल्वे गाड्यामध्ये सरासरी फक्त 80 प्रवासी कोकणात गेले. त्यामुळे विशेष रेल्वे गाड्यांचा फायदा प्रत्यक्ष कोकणवासीयांना झाला नाही.

तसेच 12 ऑगस्ट पर्यंत अधिकाधिक लोक कोकणात पोहचल्यानंतर 13 ऑगस्ट रोजी कोकणात जाणा-या चाकरमान्यांना टोल माफी घोषीत करण्याचा दिखाऊपणा राज्य सरकारने केला. या टोलमाफीचा फायदा चाकरमान्यांना कसा मिळणार असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला. प्रत्यक्ष टोल माफी साधारण 100-200 रूपये प्रत्येक वाहनाला मिळू शकते. पण कोकणात जाणा-या चाकरमान्यांच्या कोविड तपासणीचा खर्च मात्र प्रत्येकी 2500/- रू. इतका आकारण्यात आला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीची कोकणवासीयांच्या प्रती असलेली लबाडी उघड झाली आहे. 

श्री. दरेकर म्हणाले की, गणेशोत्सवाकरिता साधारण 3 लाख चाकरमानी मुंबईतून कोकणात यंदा गेले आहेत. राज्य सरकारने या चाकरमान्यांवर कोविड तपासणीचा भुर्दंड आणि एसटी प्रवासाचा खर्च हा प्रत्येक चाकरमान्यामागे साधारण 3000 रू. गृहीत धरला तर साधारण सरकारला 100 कोटींचा खर्च आला असता. परंतू ज्या कोकणाने शिवसेनेला व सरकारला भरभरून दिले त्या सरकारला कोकणातील चाकरमान्यांसाठी 100 कोटी रूपयांचा छोटासा आर्थिक भार सोसता आला नाही हे कोकणवासीयांसाठी दुर्दैवी आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या या अजब कारभारामुळे त्यांचे कोकणवासीयांच्या प्रती असलेले पुतना मावशीचे प्रेम दिसून आले. शिवसेनेच्या स्थापनेपासून ज्या कोकणवासीयांनी व चाकरमान्यांनी शिवसेनेला भरभरून प्रतिसाद दिला जास्तीत जास्त नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्री दिले त्याच कोकणाला शिवसेनेने सापत्नकपणाची वागणुक दिली. त्यामुळे आगामी काळात ज्या कोकणवासीयांना शिवसेनेने वा-यावर सोडले त्या शिवसेनेला कोकणात भारी किंमत चुकवावी लागेल असे दरेकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button