रक्षाबंधनापूर्वी सख्ख्या बहिणींनीच दिली भावाची सुपारी

कलबुर्गी : बहिण-भावाच्या नात्याला जपणार रक्षाबंधन सण आता जवळ आला आहे. पण त्याआधीच कर्नाटकमध्ये एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. इथे कर्नाटकातील कलबुर्गी इथे एका तरुणाच्या हत्येप्रकरणी त्याच्या दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे. या तपासात असा काही खुलासा झाला की संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणींचे भावासोबत मतभेद होते. याच कारणावरून या दोघांनी मिळून जुलै महिन्याच्या अखेरीस भावाच्या हत्येसाठी चार मारेकरी भाड्याने घेतले होते. रिपोर्टनुसार, बहिणींनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा भाऊ खूप कडक होता. या दोघांच्या वैयक्तिक आयुष्यात तो वारंवार ढवळाढवळ करत असे. दोन्ही बहिणींचे लग्न मोडले. यामुळे वैतागलेल्या बहिणींनी भावाचा पत्ता कट करण्यासाठी त्याची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही बहिणींना आणि ४ आरोपींनाही अटक केली आहे.
२९ वर्षीय नागराज मातामारी कलबुर्गीमधील गाझीपूरचा रहिवासी होता. २९ जुलै रोजी आळंद रोडवरील भोसगा क्रॉसिंगवर त्याचा मृतदेह आढळून आला होता. सगळ्यात धक्कायाक बाब म्हणजे ओळख लपवण्यासाठी मोठ्या दगडाने त्याचं डोके ठेचण्यात आलं होतं. तपासानंतर पोलिसांनी त्याच्या बहिणी अनिता आणि मीनाक्षीला अटक केली.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी अनेक वर्ष आपल्या नवऱ्यांपासून वेगळ्या राहिल्या आहेत. रिलेशनशिपच्या मुद्द्यावरून भाऊ सतत बहिणींना त्रास देत होता. त्यांच्यावर पाळत ठेवत होता. यावरून वारंवार त्यांच्यामध्ये भांडणं होत होती. या सगळ्याला वैतागून बहिणीने थेट भावाचा काटा काढला.
आरोपी बहिणींनी सुपारी देऊन भावाची हत्या केली. आरोपींनी ऑटोरिक्षात नागराजचा गळा कापला आणि त्यानंतर मृतदेह शहराच्या बाहेर फेकून दिला. ओळख लपवण्यासाठी त्याचा चेहरा दगडाने ठेचला. पोलिसांनी कपड्यांवरून मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या बहिणी व इतरांना माहिती दिली. बहिणींनी सुपारी मारणाऱ्यांना केलेल्या फोन कॉलच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.