breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कोल्हापुरातून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात, उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर

कोल्हापूर : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे. यातच महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अधिकृतपणे श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या नावाची घोषणा केली.

“आज कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेतली आहे. तुम्हाला आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही. ठाकरे कुटुंब आणि छत्रपती शाहू महाराजांचे ऋणानुबंध हे माझ्या आजोबांपासून आहेत. मला आनंद आहे की या पिढीत आणि पुढच्या पिढीतही ते घनिष्ठ राहतील. आज महाविकासआघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. मी महाराजांना वचन दिलं आहे की मी प्रचाराला येणार आणि विजयाच्या सभेलाही नक्की येणार”, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.

हेही वाचा – चेन्नईची धुरा यंदा मराठी माणसाच्या हातात, धोनी कर्णधार पदावरून पायउतार

“मी इतकं बोलून थांबलेलो नाही, तर मी यात माझा स्वार्थ साधलेला आहे. महाराजांकडून पुढच्या संघर्षात जो आम्ही लढतोय, त्यासाठी विजय मिळवा म्हणून आशीर्वादही घेतले आहेत. त्यांचे आशीर्वाद घेऊन मी पुढे निघत आहे. यात लपवण्यासारखं काहीही नाही. आमचं जे काही असतं ते जगजाहीर असतं. आज मला खरंच आनंद वाटला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे १९९७ -१९९८ या काळात इथे आले होते. त्यानंतर मी आता इथे आलो आहे. यापुढेही मी इथे येत राहिन”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.  यावेळी उद्धव ठाकरेंना शाहू महाराजांमुळे किती हत्तीचं बळं मिळालं, असं तुम्हाला वाटतंय, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरेंनी मी याबद्दल प्रचारसभेत बोलेन, असे सांगितले.

दरम्यान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून शाहू महाराज यांना आघाडीतील सर्वच घटकपक्षांनी पाठिंबा दिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाल्याने उद्धव ठाकरेंनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला होता. शिवसेनेतून निवडून आलेले संजय मंडलिक राज्यातील सत्तासंघर्षातील नाट्यादरम्यान शिंदे गटात सहभागी झाले. ठाकरे गटाची साथ सोडलेल्या मंडलिक यांना यंदाच्या निवडणुकीत धडा शिकवण्याचा चंग शिवसेनेच्या ठाकरे गटाने बांधला आहे. यामुळे शाहू महाराज यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीची उमेदवार उमेदवारी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना मिळणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज शाहू महाराज यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंकडून शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि शाहू महाराज यांची ही भेट न्यू पॅलेस इथे झाली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, तेजस ठाकरे, मिलिंद नार्वेकर हे नेते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button