टीम इंडियाचे टॉप बॅट्समन बाद , न्यूझीलंडची कडक सुरुवात
कॅप्टन रोहित शर्मा याने 2 धावा तर विराट आणि सर्फराज दोघेही झिरोवरच आऊट
बंगळुरु : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्याने दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची ढिसाळ सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडने टीम इंडियावर कुरघोडी करत झटपट 3 झटके दिले. टीम इंडियाने त्यामुळे पूर्णपणे बॅकफुटवर गेली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाची धुरा ही युवा ब्रिगेडवर असणार आहे.
न्यूझीलंडने कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि सर्फराज खान या तिघांना झटपट बाद करुन मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. या तिघांपैकी विराट आणि सर्फराज या दोघांना तर भोपळाही फोडता आला नाही. टीम साऊथी याने रोहित शर्माचा लेग स्टंप उडवत टीम इंडियाला पहिला झटका दिला. साऊथीची रोहितला टेस्टमध्ये आऊट करण्याची ही तिसरी वेळ ठरली. रोहित 16 बॉलमध्ये 2 रन्स करुन तंबूत परतला.
विराट कोहली डक
रोहितनंतर विराट कोहली तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आला. विराटचं हे आयपीएलमधील होम ग्राउंड आहे. त्यामुळे विराटकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र ती फक्त अपेक्षाच राहिली. विराटला भोपळाही फोडता आला नाही. विराटने 8 बॉल खेळले. तर नवव्या बॉलवर विराट आऊट झाला. विलियम ओरुर्के याने ग्लेन फिलिप्स याच्या हाती विराटला कॅच आऊट केलं. विराटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याची ही 38 वी वेळ ठरली.
सर्फराजकडून घोर निराशा
सर्फराज खान याला या सामन्यात शुबमन गिल याच्या जागी संधी देण्यात आली. सर्फराजने इराणी ट्रॉफीत द्विशतक केल्याने त्याच्याकडून चांगली खेळी अपेक्षित होती. तसेच झटपट 2 विकेट्स घेतल्याने त्याच्यावर मोठी जबाबदारी होती. मात्र सर्फराज फटका मारण्याच्या नादात आऊट झाला. सर्फराजने पुढे येत मिड ऑफवरुन मोठा फटका मारण्याच्या नादात झिरोवर कॅच आऊट झाला. डेव्हॉन कॉन्व्हे याने अप्रतिम कॅच घेतला. सर्फराज आऊट झाल्याने टीम इंडियाची 3 बाद 10 अशी नाजूक स्थिती झाली आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.