जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार? शरद पवारांचे सूचक विधान

मुंबई | महायुतीने काल (16 बुधवार) पत्रकार परिषद घेऊन सरकारचं रिपोर्ट कार्ड सादर केलं. यावेळी महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना आव्हान देत आधी महाविकास आघाडीने चेहरा सांगावा असं विधान केलं. त्यानंतर शरद पवार यांनी एक सूचक विधान केलं आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आणि राजकीयदृष्ट्याही राज्याने प्रगती करण्यासाठी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्राचा कारभार चुकीच्या हातांमध्ये आहे. त्याचा फटका सगळ्या राज्याला बसला आहे. महाराष्ट्राची जी प्रतिमा महायुतीमुळे मलीन झाली आहे ती सुधारण्याची आवश्यकता आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात जसा महाराष्ट्र होता तसा महाराष्ट्र घडवण्याची आवश्यकता आहे. राज्याचा विकास जयंत पाटील योग्य पद्धतीने करु शकतात याची मला खात्री आहे. असं शरद पवार यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपाच्या भाषणात म्हटलं.
हेही वाचा – पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात राजकीय पक्षांची बैठक संपन्न
जयंत पाटील यांनी सात हजार किमीची शिवस्वराज्य यात्रा काढली. तसंच ते सुमारे ७६ मतदारसंघांमध्ये गेले होते. आपलं राज्य विकासाच्या बाबतीत खालच्या क्रमांकावर फेकलं गेलं आहे. जयंत पाटील यांनी राज्याचा दौरा केला आणि त्यांनी लोकांमद्ये आशा पल्लवित केल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी खात्री आहे की ते महाराष्ट्राला योग्य दिशा देतील, असं शरद पवार म्हणाले.
मतदारांनी महायुतीला लोकसभा निवडणुकीत जागा दाखवून दिली. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सरकारने मग विविध योजना आणल्या. लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान केल्याचं महायुतीने सांगितलं पण महिला सुरक्षेचं काय? कारण अत्याचारांच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत, असंही शरद पवार म्हणाले.





