महानगरपालिकेने खेळाडूंना दुखापत विमा संरक्षण द्यावे..!
भाजपा क्रीडा शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांची मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये हजारो खेळाडू उत्साहाने सहभागी होत असतात. मात्र, खेळादरम्यान अनेकदा खेळाडूंना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागते. अशा वेळी उपचारांचा आर्थिक भार खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांवर पडतो. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने सर्व सहभागी खेळाडूंना दुखापत विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी भाजपा क्रीडा शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांनी केली आहे.
ही मागणी त्यांनी क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी विरोधी पक्षनेतेभाऊसाहेब भोईर, माजी क्रीडा समिती सभापती व नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे, नगरसेवक निलेश नेवाळे, शाम जगताप, सामाजिक कार्यकर्ते सचिन सानप आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील सर्वांत मोठा लक्ष्मी-नारायण पूजन सोहळा!
या मागणीमुळे खेळाडूंमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, युवक क्रीडा क्षेत्राकडे अधिक आकर्षित होतील आणि शहरातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. दरम्यान, सभापती कैलास कुटे यांनी या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
खेळाडू स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी जीवाची पर्वा न करता खेळतात. मात्र, दुखापत झाल्यास तातडीच्या उपचारांसाठी आवश्यक आर्थिक व वैद्यकीय मदत उपलब्ध नसते. त्यामुळे स्पर्धेच्या नोंदणी प्रक्रियेसोबतच सर्व खेळाडूंना विमा संरक्षण देण्यात यावे. तसेच, गंभीर दुखापतीच्या प्रसंगी तातडीने उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक स्पर्धास्थळी वैद्यकीय पथक व रुग्णवाहिकेची व्यवस्था सक्तीची करावी.
– अरुण पाडुळे, क्रीडा शहराध्यक्ष, भाजपा
“महानगरपालिकेच्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आपल्या शहराचे नाव उज्वल करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली असते. मात्र, दुखापत झाल्यास त्यांच्या उपचारांची जबाबदारी पूर्णपणे कुटुंबावर येते, ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंना दुखापत विमा संरक्षण देणे ही काळाची गरज आहे.
– प्रा. उत्तम केंदळे, नगरसेवक तथा माजी क्रीडा सभापती
“क्रीडा स्पर्धा म्हणजे केवळ स्पर्धा नसून शहराच्या आरोग्यदायी आणि सशक्त भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. मात्र, खेळादरम्यान होणाऱ्या दुखापतींसाठी योग्य वैद्यकीय सुविधा आणि विमा संरक्षण उपलब्ध नसेल, तर अनेक होतकरू खेळाडू मागे हटू शकतात. त्यामुळे महानगरपालिकेने प्रत्येक स्पर्धेसाठी विमा संरक्षण, वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिकेची सक्तीची व्यवस्था करावी.
– निलेश नेवाळे, नगरसेवक





