“मी नाही, माझा पक्ष लढेल”; प्रशांत किशोर यांचा मोठा राजकीय निर्णय

Prashant Kishor | नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यंदा इंडिया आघाडी आणि एनडीए या प्रमुख आघाड्यांबरोबरच प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाकडूनही जोरदार टक्कर दिली जाणार होती. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत किशोर यांनी मोठा निर्णय घेत निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे.
प्रशांत किशोर यांनी सांगितले की, आमच्या पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसार मी स्वतः निवडणुकीला उभा राहणार नाही. मी पक्षाच्या इतर उमेदवारांच्या प्रचारावर लक्ष केंद्रीत करणार आहे. जर मी निवडणुकीला उभा राहिलो, तर पक्षाच्या एकूण प्रचारावर आणि संघटनात्मक कामावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पक्षहितासाठी मी हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप करा; मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
बिहारमध्ये जन सुराज पक्षाची कामगिरी कशी असेल, या प्रश्नावर उत्तर देताना प्रशांत किशोर म्हणाले की, जन सुराज पक्षाला एकतर प्रचंड विजय मिळेल किंवा त्यांना मोठा पराभव सहन करावा लागेल. मला १० पेक्षा कमी जागा किंवा १५० पेक्षा जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान काहीही होण्याची शक्यता नाही.
बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दल आणि भाजप युतीचे काय होईल,या प्रश्नाला उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी अंदाज वर्तविला की, ही युती उमेदवार निश्चित करण्यात अपयशी ठरल्यामुळे एनडीए सत्तेबाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही. कारण जेडीयूसाठी चित्र आणखी निराशाजनक झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या बंडामुळे नितीश कुमार यांच्या पक्षाची संख्या ४३ पर्यंत घसरली होती, असेही त्यांनी यावेळी सांगितले.




