breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘३० वर्षांपूर्वी भाजपाकडे महाराष्ट्रात पोस्टर लावायला माणसंही नव्हती’; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा महाराष्ट्रात कुणामुळे वाढला, फोफावला, तरारला, फुगला आणि सुजला हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांना जर हे आमच्याविषयी वाटत असेल तर भाजपाला एकच आव्हान आहे त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले, भाजपाकडे ३० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पोस्टर चिकटवण्यासाठी माणसं नव्हती. भारतीय जनता पार्टीचा जय म्हणायला तेव्हा दोन टाळकीही नव्हती. अशा वेळी भाजपाला खांद्यावर घेऊन गावागावांत शिवसैनिक फिरले. महाराष्ट्रातल्या भाजपाला शिवसेनेने वाढवलं हे सांगायला कुणीही पंडिताची गरज नाही. देशात कुणालाही विचारलंत तरीही त्याचं उत्तर मिळेल. भाजपा महाराष्ट्रात कुणामुळे वाढला, फोफावला, तरारला, फुगला आणि सुजला हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांना जर हे आमच्याविषयी वाटत असेल तर भाजपाला एकच आव्हान आहे त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी.

हेही वाचा  –  CID फेम दिनेश फडणीस यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन

मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणुकांपासून तुम्ही का पळ काढता आहात? त्याचं उत्तर द्या. निवडणुका घेतल्या की कोण कोणामुळे मोठं झालं याचं उत्तर जनता देईल. आपण कोण होतात, काय झालात आणि कुणामुळे झालात? याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. हिंदू संस्कृतीमध्ये कृतज्ञता या शब्दाला महत्व आहे. हिंदुत्व जर भाजपा मानत असतील तर कृतज्ञता आणि उपकारांची जाण या दोन शब्दांचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा. बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक वेळी भाजपासाठी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला आहे. त्याचं स्मरण हे नव्या पिढीने करावं, त्यांना माहीत नसेल तर आम्ही सांगायला तयार आहोत. आज गोपीनाथ मुंडे नाहीत, लालकृष्ण आडवाणी एका बाजूला आहेत. आडवाणी यांनाही विचारलं तरीही ते सांगतील महाराष्ट्रात भाजपा कुणामुळे वाढली? असं संजय राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याचा निर्णय दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचं पालन करण्यासाठी घेतला होता. त्यावेळी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांना सांगितलं की गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरुन मोदींना हटवलंत तर गुजरात हातचं जाईल आणि हिंदुत्वाचं नुकसान होईल. त्यावेळी वाजपेयींनी निर्णय मागे घेतला. आज तेच मोदी दिल्लीत आहेत. त्याच मोदींच्या जोरावर हे महाराष्ट्रातले ओंडके, सोंडके डोळे वटारुन दाखवत आहेत. २०२४ ला हे नसेल, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button